कार्यशाळेला पर्यावरण प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी : पर्यावरण संवर्धन समिती (इसिए), पिंपरी-चिंचवड महापालिका शिक्षण विभाग, आयबीएम कंपनी स्वयंसेवक, बिव्हिजी इंडिया, डेली डम्प ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सेंद्रिय खत बनविण्याबाबतच्या कार्यशाळेला पर्यावरण प्रेमी शिक्षकांचा, नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विभागाचे निवृत्त अधिकारी बाळासाहेब ओव्हाळ, शहाजी ढेकणे, पालिकेच्या सहाय्यक आयुक्त आशादेवी दुर्गुडे, प्रशासन अधिकारी बजरंग आवारी, इसिएचे संस्थापक अध्यक्ष विकास पाटील, विनिता दाते, पुरुषोत्तम पिंपळे, डॉ. अभय कुलकर्णी, राहुल श्रीवास्त्वाव, शिकंदर घोडके, अनिल दिवाकर, मोनिका शर्मा, सुनीता जुन्नरकर, रंजना कुदळे, सुभाष चव्हाण, गोविंद चितोडकर, राम भिडे, प्रज्ञा अलाटे, प्राची टेंबे, मीनाक्षी मेरुकर, अनघा दिवाकर आदी उपस्थित होते.
पर्यावरण पुरस्कार प्रदान
या कार्यशाळेस उपस्थित असलेल्या प्रत्येक शिक्षकाला मोशी कचरा डेपोत निर्माण होणारे सेंद्रिय खत मोफत सीलबंद पिशवीतून भेट वस्तू म्हणून देण्यात आले.विद्यार्थी पर्यावरण सामितीच्या अंतर्गत पर्यावरण बाबत केलेल्या उपक्रमांची माहिती तक्ता रूपाने मांडण्यात आली होती. त्यांच्या प्रदर्शनाच्या परीक्षणाचे कार्य आयबीएम कंपनीच्या स्वयंसेवकांनी केली. त्यातून शहर पातळीवर माध्यमिक शाळांचे तीन आणि प्राथमिक शाळांचे तीन तक्ते निवडण्यात आले. त्यांना इसिए स्पेशल नावाने पर्यावरण पुरस्कार सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
उपस्थितांनी केले मार्गदर्शन
डेली डम्प संस्थेच्या प्रज्ञा अलाटे यांनी शिक्षकांना आपल्या शाळेत विद्यार्थ्यांसोबत कचरा व्यवस्थापनबाबत काय बोलावे व सेंद्रिय खताच्या पद्धती बाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. पालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रभाकर तावरे यांनी सेंद्रिय खत बनविण्याच्या कार्यशाळेत कचरा व्यवस्थापन या विषयावर प्रकाश टाकला. विकास पाटील यांनी प्रत्येक शाळेच्या आवारात सोप्या व साध्या पद्धतीने कचर्याचे विघटन करून त्यापासून सेंद्रिय खत निर्माण करता येईल याची पद्धती समजावून सांगितली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाकर मेरुकर यांनी केले. तर आभार दत्तात्रेय कुमठेकर यांनी मानले.