इसिसचे भोजपुरी कनेक्शन

0

नवी दिल्ली । गत वर्षभरात देशभरात झालेल्या भारतीय रेल्वे अपघातात सहभागी असल्याच्या आरोपाखाली एनआयएने तिघांना अटक केली असून, हे तीनही आरोपी भोजपुरी सिनेमातील कलाकार असल्याचे एनआयएने म्हटले आहे. या तिघांनाही इसिसने काही पैशाचा मोबदला देऊन भारतातील महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील रेल्वे टॅ्रकला बाधा आणणे आणि रेल्वे ट्रॅकवरून खाली उतरवणे, आदी कामे देण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार पाकिस्तानातील इसिस एजंट शमशुल होदा याच्या संपर्कात हे तीघे होते. त्याच्यात अनेकदा बैठक आणि फोनवर संपर्क झालेला आहे. 1 ऑक्टोबर 2016 रोजी रेल्वे अपघातादरम्यान जी स्फोटके आणि इतर साहित्य मिळाले होते. त्यात या तिघांची ओळख पटवणार्‍या काही गोष्टी आढळून आल्या होत्या. गजेंद्र शर्मा, ब्रजकिशोर गिरी आणि मुकेश यादव अशी ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत.

21 नोव्हेंबर रोजी इंदौर पाटणा एक्स्प्रेस ट्रॅकवरून खाली घसरल्याने 150 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. याच कालावधी दरम्यान ब्रजकिशोर गिरी हा नेपाळमध्ये शूटिंग करीत होता. याच काळात तो कानपूर रेल्वे अपघातात सामील असणार्‍या पाकिस्तानी इसिस एजंट शमसूलच्या संपर्कात आला होता. ब्रजकिशोरला मोठा निर्माता दिग्दर्शक बनायचे होते. मात्र, त्यासाठी त्याच्याकडे बक्कळ पैसा नव्हता, नेमके शमसूलने त्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले आणि देशविरोधी कारवाईत त्याचा सहभाग करून घेतला, असे प्राथमिक माहितीत समोर आले आहे.

काठमांडूतूनच शमसूलला अटक

एनआयएने केलेल्या चौकशीत ब्रजकिशोरप्रमाणेच गजेंद्र शर्मालाही स्वत:ची बिग बजेट फिल्म काढायची होती. याकरिता तो अनेक दिवसांपासून ब्रजकिशोरच्या मागे लागला होता. नेपाळची राजधानी असणार्‍या काठमांडूमधूनच शमसूलला इसीसचा संशयित आणि रेल्वे अपघातातील घातापाताचा मास्टर माईंड म्हणून अटक करण्यात आली होती. सध्या त्याच्याकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येतील, अशी अपेक्षा राष्ट्रीय गुप्तहेर यंत्रणेने व्यक्त केली आहे.