इसिसच्या टोळीचे धागेदोरे, जाळे देशभर पसरलेय

0

नवीदिल्ली: उत्तरप्रदेशच्या विधानसभा निवडणुकीची अखेरची फ़ेरी व्हायच्या आदल्या दिवशी राजधानी लखनौ येथे एका घरात थरारनाट्य रंगले. त्यात सैफ़ुल्ला नावाचा इसिसचा एक म्होरक्या मारला गेला. पण मध्यप्रदेशातील एका रेल्वे अपघातानंतर सुरू झालेल्या या शोध मोहिमेने देशात पसरलेल्या इसिसच्या जाळ्याचा तपास सुरू झाला आहे. इसिसचा खलिफ़ा बगदादी याने आजवर अनेक धमक्या दिल्यावरही त्याची गंभीर दखल इथे घेतली जात नव्हती. आता त्याकडे तपासयंत्रणा बारकाईने लक्ष घालतील. कारण लखनौच्या या कारवाईत अतिशय घातक गोष्टी हाती लागल्या आहेत.

काही वर्षापुर्वी इंडियन मुजाहिदीन नावाची संघटना धुमाकुळ घालत होती. त्याच्याही आधी सिमी नावाच्या संघटनेने घातपात केले होते. प्रत्येकवेळी नवे नाव समोर येते आणि त्याच्या बंदोबस्त होईपर्यंत भलतीच नवी संघटना उदयास येत असते. प्रत्येकवेळी अशा नव्या संघटनेचे नाव पुढे आल्यावर त्यात तथ्य नसल्याचे आक्षेप घेतले जातात. मात्र साक्षीपुरावे व गुन्हेगार हाती लागून खटले होईपर्यंत, अशा संघटना अंतर्धान पावतात. नव्याच नावाने घातपाताचा उद्योग सुरू होतो. आताही रेल्वे घातपातामध्ये पाकचा हात असल्याचे मानले जात होते आणि त्याचा इन्कार करण्याचा खेळ सुरू झाला होता. पण सैफ़ुल्ला प्रकरणाने सर्वच शंकेखोरांना चपराक हाणली आहे.

इसिसच्या अनेक संशयितांना मंगळवारच्या कारवाईत शिताफ़ीने पकडल्याने हे देशव्यापी जाळे असल्याचे लक्षात आले आहे. कारण या लोकांनी जमवलेली स्फ़ोटक व घातक सामग्री देशाबाहेरून आलेली नाही. ज्या सहजपणे त्यांनी घातपात केले, याचा अर्थच त्यांना स्थानिक पातळीवर सहाय्य करणारेही काही छुपे लोक असू शकतात. आता त्याची पाळेमुळे सुरक्षा यंत्रणांना खोदून काढावी लागणार आहेत. मात्र त्यात राजकीय हस्तक्षेप होत राहिल्यास इसिसच्या जागी नवाच मुखवटा व नाव घेऊन अन्य कुठले भूत उभे रहाण्याची शक्यता नाकरता येत नाही.