‘इसीए’तर्फे पर्यावरणदूत विद्यार्थ्यांचा गौरव

0

विद्यानिकेतन टाटा मोटर्स शाळेत पार पडला कार्यक्रम

पिंपरी-चिंचवड : पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने विद्यानिकेतन टाटा मोटर्स, पिंपरी या शाळेत मागील वर्षी विद्यार्थी पर्यावरण समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर या शाळेतील शिक्षक व विद्यार्थ्यांनी विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले आहेत. त्याची दखल घेऊन पर्यावरण संवर्धन समितीच्या वतीने शाळेतील पाच पर्यावरणदूत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. त्यात वैष्णवी सुवर्णकार, प्रणव डाळीमकर, भक्ती परमार, प्रणव रमाने, प्रज्ज्वल चिंचोलकर यांचा समावेश होता.

यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष विकास पाटील, उपमुख्याध्यापक वसंथा रामकृष्णन, बाणी चौधरी, प्रभाकर मेरूकर, दत्तात्रेय कुमठेकर, गोविंद चितोडकर, सुभाष चव्हाण, गोरक्षनाथ सानप, शिकंदर घोडके आदींची उपस्थिती होती. ग्रीन स्कूल कॅप्टन गौरव पाटील, स्वाती लडकत, प्राची आठल्ये, प्रणित वाबळे यांनी संपूर्ण कार्यक्रम हाताळला. विद्यानिकेतन टाटा मोटर्स या शाळेत गेल्या वर्षभरापासून विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविले जात आहेत. येथील विद्यार्थ्यांनी नुकताच एक उपक्रम राबविला. दुधाच्या 2200 प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करून विद्यार्थ्यांनी अर्जुन झाडाच्या बिया लावल्या व त्यांची छोटी छोटी रोपे बनविली. त्यानंतर ‘झाड’ या विषयावर स्मरणचित्र काढण्याची स्पर्धादेखील पार पडली. या स्पर्धेत 800 विद्यार्थी सहभागी झाले होते.