भोपाळसह शिर्डीत पथक ठाण मांडून ; बडोद्याचे पथक परतले
धुळे- सोनगीर-दोंडाईचा महामार्गावर अहमदाबादच्या इस्टेट ब्रोकर्स एजंट गोपाल मोतीलाल काबरा (49) यांचा गुरुवारी पहाटे खून झालेला मृतदेह आढळला होता. इस्टेट व्यावसायातील अंतर्गत वादातून काबरा यांचा खून झाल्याची तक्रार त्यांच्या पत्नीने नोंदवल्याने तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तर पोलिसांनी सर्व शक्यता गृहित धरून तपासाला वेग दिला होता. आरोपींच्या अटकेसाठी भोपाळ, बडोदा व शिर्डीत पथक पाठवण्यात आले होते. बडोद्यात पथक परतले असलेतरी शिर्डीसह भोपाळमध्ये पथक ठाण मांडून एक-दोन दिवसात या खुनाची उकल होण्याची दाट शक्यता सूत्रांनी वर्तवली.
व्यावसायीक वादातून काबरा यांचा खून
इस्टेट ब्रोकर्स एजंट असलेल्या गोपाळ काबरा यांचा व्यावसायीक वादातून सोनगीरजवळ खून झाल्याची दाट शक्यता आहे. मयताची पत्नी कांचन यांच्या फिर्यादीनुसार इस्टेट ब्रोकर्स एजंट राजीव त्रिवेदी, चालक ललितभाई तसेच विजय (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातमधील एका भूखंडाच्या व्यावसायीक विक्रीतून एजंट राजीव त्रिवेदी व गोपाळ काबरा यांच्यात मतभेद होवून त्यांचा काटा काढण्यात आल्याची शक्यता आहे. मेहुल प्रजापती यांच्या मालकीचा हा भूखंड असल्याचे समजते. संशयीत आरोपी राजीव त्रिवेदी हा यापूर्वी गुटखा व्यावसायीकदेखील असल्याची माहिती पुढे आली मात्र महाराष्ट्रात गुटखाबंदी झाल्यानंतर अहमदाबादमध्ये रीअल इस्टेट एजंट म्हणून काम करू लागल्याचेही सांगण्यात आले.
स्थानिक गुन्हे शाखा लवकरच उलगडणार धागेदोरे
मयत काबरा यांच्या खुनाच्या तपासासाठी बडोद्यात गेलेले पथक परतले आहे तर शिर्डीसह भोपाळमधील पथक रविवारी वा सोमवारी धुळ्यात परतणार आहे. धुळे स्थानिक गुन्हे शाखेकडे या गुन्ह्याचा तपास वर्ग करण्यात आल्याने येत्या एक वा दोन दिवसात या गुन्ह्याचा पर्दाफाश होईल, अशी दाट शक्यता आहे शिवाय पथक आरोपींच्या मागावर असून लवकरच त्यांना अटक होईल, असेही सूत्रांनी सांगितले. अधिक तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.