नागरिक, प्रशासनाच्या एकत्रीकरणातून प्रकल्प यशस्वीची कथा
पिंपरी-चिंचवड : महापालिकेचा स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीबाबत अन्य शहरांनी केलेल्या प्रयोगांची माहिती प्रशासनाकडून घेतली जात आहे. इस्त्राईलच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महापालिकेला भेट दिली. नागरिक आणि प्रशासनाने एकत्रित येऊन स्मार्ट सिटी प्रकल्प कसा यशस्वी केला? याचे सादरीकरण केले. नागरिकांच्या सहभागाने स्मार्ट सिटी योजना यशस्वीपणे राबविणे शक्य होणार असल्याबद्दलही चर्चा करण्यात आली.
नागरिकांच्या सूचनांची दखल घ्या
पॅन सिटी आणि एरियाबेस डेव्हपमेंटचे नियोजन स्मार्ट सिटीसाठी केलेल्या कंपनीकडून केले जात आहे. यासंदर्भात कंपनीची प्राथमिक बैठकही झाली आहे. त्यानुसार निविदा प्रक्रियांचे कामकाज सुरू झाले आहे. इस्त्राईलमधील तेलअविव या शहराच्या शिष्टमंडळासोबत स्मार्ट सिटी विषयावर चर्चा केली. यावेळी महापालिकेच्या वतीने शहराची माहिती देण्यात आली. तसेच सध्या सुरू असणार्या विविध प्रकल्पांची माहिती दिली. तेलअविवच्या सदस्यांनी स्मार्ट सिटी योजना कशी यशस्वी केली याची माहिती दिली. स्मार्ट सिटी योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी शहरातील विविध स्तरांतील नागरिकांचा सहभाग घेणे आवश्यक आहे. नागरिकांकडून येणार्या सूचनांचा अंतर्भाव करून स्मार्ट सिटी योजना प्रभावीपणे राबविणे शक्य होऊ शकते. त्यामुळे नागरिकांचा सहभाग वाढविणे गरजेचे असल्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली.
हे अधिकारी उपस्थित
चिंचवड येथील ऑटो क्लस्टर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात सुरुवातीला शिष्टमंडळाने एक ध्वनीचित्रफीतही दाखविली. स्मार्ट सिटी योजनेत कोणकोणत्या घटकांचा समावेश केला आहे. याचीही माहिती शिष्टमंडळातील सदस्यांनी महापालिका अधिकार्यांना दिली. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, नगररचना उपसंचालक प्रकाश ठाकूर, सह आयुक्त दिलीप गावडे, सहशहर अभियंता प्रवीण तुपे, मुख्य लेखापाल पद्मश्री तळदेकर, सहाय्यक आयुक्त मनोज लोणकर, चंद्रकांत इंदलकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण लडकत, बांधकाम परवाना विभागाचे प्रमुख आयुबखान पठाण, संगणक विभागाचे प्रमुख नीळकंठ पोमण, सुनील ओंबासे आदी उपस्थित होते.