इस्त्राईल भारताच्या प्रेमात!

0

तेल अवीव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक इस्त्राईल दौर्‍यात दोन्ही देशांदरम्यान विविध सात महत्वपूर्ण सामंजस्य करारांवर दोन्ही पंतप्रधानांनी बुधवारी स्वाक्षर्‍या केल्या. दोन्ही देशांदरम्यान कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि पाणी व्यवस्थापनाशी संबंधित हे करार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मोदींच्या या भेटीने दोन्ही देशांदरम्यान मैत्रीच्या नव्या पर्वास सुरुवात झाली आहे. मैत्रीच्या या गाठी स्वर्गात बांधल्या गेल्या आहेत, अशा शब्दांत नेतान्याहू यांनी भारताविषयीचे प्रेम व्यक्त केले. मोदी यांनी यावेळी नेतान्याहू यांना सपत्नीक भारतभेटीचे निमंत्रण दिले. त्यावर लगेच प्रतिसाद देत, मी हे निमंत्रण स्वीकारल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केले. इस्त्राईलने उत्तर प्रदेशात गंगा नदीच्या स्वच्छतेसाठी आणि पाणी व्यवस्थापनासाठी सहकार्य करण्याचा करार केला असून, त्यासोबत दोन्हीही नेत्यांनी दहशतवादाचा एकत्र सामना करण्याचाही निर्णय घेतला आहे. मोदींच्या या भेटीदरम्यान अनेक वैश्विक समस्यांवरही चर्चा झाली. इस्त्राईलने तिसर्‍या जगतातील म्हणजे आफ्रिकी लोकांसाठी काम करण्याची इच्छाही व्यक्त केली.

औद्योगिक संशोधनासाठी चार कोटी अमेरिकन डॉलर्सचा निधी
भारत व इस्त्राईलदरम्यान ज्या सात क्षेत्रांत करारांवर स्वाक्षर्‍या झाल्यात, त्यात औद्योगिक विकास, जलसंरक्षण, जल प्रबंधन, कृषी विकास, अणू ऊर्जा, जीओ-लीओ ऑप्टिकल लिंक आणि छोट्या उपग्रहांचा विकास यांचा समावेश आहे. या दोन्ही देशांनी औद्योगिक संशोधन आणि विकासासाठी चार कोटी अमेरिकन डॉलरचा निधी उभा करण्यावरही यावेळी दोन्ही देशांच्या पंतप्रधानांदरम्यान एकमत झाले. संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, आम्ही पश्चिम आशिया आणि व्यापक क्षेत्राच्या परिस्थितीवर चर्चा केली. भारताला शांतता, संवाद आणि संयम कायम राहील, अशी आशा आहे. तर नेतान्याहू म्हणालेत, की दहशतवादी शक्ती क्षेत्रीय शांततेला आव्हान देत आहेत. भारतासोबत सर्वपातळीवर सहकार्य करण्यास इस्त्राईलची तयारी असून, भारत ज्या प्रकारे हिंसा आणि दहशतवादी धमक्यांना सामोरे जात आहे, त्याच संकटांना इस्त्राईलदेखील झेलत आहे. त्यामुळे आम्ही दोघांनीही एकमेकांच्या रणनैतिक संरक्षणासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.

भारत आणि इस्त्राईल यांच्यातील मैत्रीच्या गाठी स्वर्गातच बांधल्या गेल्या आहेत. आपण त्यांना केवळ मूर्तरूप देत आहोत. दोन्ही देशांतील लोकशाहीचे नाते भगिनीसमान आहे.
बेंजामिन नेतान्याहू, पंतप्रधान इस्त्राईल

इस्त्राईलने जो विकास साधला आहे तो कौतुकास पात्र आहे. लोकशाही मूल्ये आणि आर्थिक विकास यांबाबतीत दोन्ही देशांचे विचार एकसमान आहेत. ही मैत्री जागतिक शांतता आणि स्थैर्य यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
रेंद्र मोदी, पंतप्रधान

सर्वच टप्प्यांवर इस्त्राईलसोबत सहकार्य : मोदी
2008च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात इस्त्राईली मुलगा मोशे होल्टजबर्ग हा यरुशलम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी आला होता. मोदींना भेटल्यानंतर तो उत्साहीत दिसून आला. मोदींनी त्याला पुन्हा भारतभेटीचे निमंत्रण दिले. मोदींनी यावेळी इस्त्राईलचे राष्ट्राध्यक्ष रुवन रिवलिन यांचीही भेट घेतली व द्वीपक्षीय संबंधांना अधिक मजबूत करण्याबाबत चर्चा केली. इस्त्राईलच्या अत्याधुनिक औद्योगिकीकरणामध्ये मेक इन इंडिया योजनेला समाविष्ट करण्याबाबतही चर्चा झाली. इस्त्राईल हा भारताचा खरा मित्र असल्याचे सांगून, मोदी यांनी रिवलिन यांनी गतवर्षी नोव्हेंबरमध्ये दिलेल्या भारतभेटीच्या आठवणींना उजाळा दिला. भविष्यात भारत आणि इस्त्राईल सर्वच टप्प्यांवर एकत्र काम करतील, असा आशावादही मोदींनी या भेटीत व्यक्त केला.