राजशिष्टाचार बाजूला सारून मोदींकडून इस्त्राईल पंतप्रधानांचे स्वागत
नवी दिल्ली : ‘इंडियाज मोस्ट फेव्हर्ड नेशन’ म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो, त्या इस्त्राईल देशाचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचे रविवारी सहा दिवशीय भारत दौर्यावर आगमन झाले. आपल्या या खास मित्राचे स्वागत करण्यासाठी सर्वप्रकारचे राजशिष्टाचार बाजूला सारून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः विमानतळावर हजर होते. नेतन्याहू यांच्यासोबत उद्योगपतींचे शिष्टमंडळही भारत दौर्यावर आलेले आहे. दिल्ली, अहमदाबाद, मुंबई येथे नेत्यनाहू यांचे विशेष कार्यक्रम आयोजित असून, या दौर्यात संरक्षणविषयक मुद्द्यांसह इतर महत्वपूर्ण मुद्द्यांवर द्विपक्षीय चर्चा होणार आहे. तसेच, सोमवारी हैदराबाद हाऊस येथे मोदी-नेत्यनाहू यांच्यात द्विपक्षीय चर्चा व काही करारदेखील होणार आहेत. एअरपोर्टवर मोदी यांनी नेत्यनाहू यांचे अगदी खास मित्राचे करावे तसे स्वागत केले. दोघांनी एकमेकांना कडकडून मिठी मारली. ‘इस्त्राईल’ से आया मेरा दोस्त, असे गीतच यावेळी प्रत्येकाला आठवले.
विविध शहरांना नेत्यनाहू देणार भेटी
गतवर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्राईलचा दौरा केला होता. या देशाच्या भूमीत पाय ठेवणारे ते पहिलेच भारतीय पंतप्रधान होते. त्यानंतर खास मोदींच्या निमंत्रणावरून पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे भारताच्या सहा दिवशीय दौर्यावर आले आहेत. लष्करी सहाय्य, व्यापारी करार, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक देवाणघेवाण याबाबत या दोन नेत्यांमध्ये महत्वपूर्ण करार होतील, अशी माहिती पीएमओच्या सूत्राने दिली आहे. सोमवारीच या संदर्भात महत्वाची बैठक होत असल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले. या भेटीत पॅलेस्टाईनचा मुद्दादेखील उपस्थित केला जाऊ शकतो. शिवाय, नेत्यनाहू हे दिल्लीसह मुंबई, आगरा, अहमदाबाद येथेही जातील, असे मंत्रालयाचे संयुक्त सचिव बी. बाला भास्कर यांनी सांगितले.
तीनमूर्ती स्मारकाला ‘हाईफा’ जोडले!
बेंजामिन नेत्यनाहू हे दिल्लीत पोहोचताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना महत्वपूर्ण भेट दिली. ही भेट ऐतिहासिक अशीच राहणार आहे. एअरपोर्टवर मोदींनी त्यांचे गळाभेट घेऊन स्वागत केले व दिल्लीतील तीन मूर्ती स्मारकस्थळी त्यांना घेऊन गेले. या तीनमूर्ती स्मारकाला इस्त्राईलमधील हाईफा या शहराचे नावही जोडून देत त्याचे नव्याने नामकरण करण्यात आले. त्यामुळे या तीनमूर्ती लेन या चौकाचे नाव आता ‘तीन मूर्ती हाईफा’ असे ठेवण्यात आलेले आहे. याप्रसंगी बेंजामिन नेतन्याहू यांच्यासह त्यांच्या पत्नी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ठिकाणी शहिदांना श्रद्धांजलीदेखील अर्पण केली. पहिल्या महायुद्धात भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य गाजवत इस्त्राईलमधील हायफा हे शहर स्वातंत्र्य केले होते. भारतीय सैन्याने तुर्क व जर्मनीच्या सैन्याशी झुंज दिली होती. या युद्धात भारतीय सैन्याने केवळ भाले, तलवारी आणि घोड्यांच्या सहाय्याने मशीनगनधारी सैन्याला पराभूत केले होते. त्यात 44 भारतीय सैनिक शहीद झाले होते. या घटनेच्या प्रित्यर्थ हे नामकरण करण्यात आले आहे.