इस्त्रायलकडून विजिगीषू वृत्तीही आयात करा!

0

इस्रायलविषयी भारतीयांना विशेष आकर्षण आहे. कारण गेल्या दोन दशकांपासून तो आपला दाता आहे. केरळ राज्याहूनही लहान असलेल्या आणि 7 इस्लामी देशांनी वेढलेल्या या देशाने जे साध्य केले आहे, ते थक्क करणारे आहे. भारतापाठोपाठ 1948 मध्ये स्वातंत्र्य मिळालेल्या इस्रायलने किती मोठा पल्ला पार केला आहे, त्याची कल्पना येऊ शकते. पाण्याचे दुर्भिक्ष, वाळवंटी भूभागाचा मोठा पट्टा, अत्यंत कमी पाऊस अशा प्रतिकूल गोष्टींशी टक्कर देत इस्रायलने उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून कृषी प्रगती साधली आहे. तेथील डोंगराळ भागात वर्षाला केवळ 700 ते 800 मिलीमीटर पाऊस पडतो, याउलट आपल्याकडे तशाच प्रकारचे वातावरण असलेल्या कोकण भागात 3 ते 4 हजार मिलीमीटर पाऊस पडतो. असे असूनही ठिबक सिंचनाचा योग्य वापर, पाणी वितरणाचे संगणकीकरण, शेतीला पिकाच्या प्रकारानुसार ठरावीक प्रमाणातच पाणी देणे यामुळे तेथे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होते आणि आपल्यासारखी दुष्काळाची स्थिती कधीच निर्माण होत नाही. संरक्षण सामग्रीची निर्मिती, रोबोटिक्स, औषधनिर्मिती, हिर्‍याला पैलू पाडणे, हेही इस्रायलमधील प्रमुख व्यवसाय आहेत. स्वातंत्र्यानंतर केवळ 12 वर्षांत हा देश विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत विराजमान झाला आहे, तर आपण अजूनही विकसनशील राष्ट्रच आहोत, हा वस्तुस्थितीतील भेद आहे. तेथील नागरिकही शिस्तप्रिय आहेत.

इस्रायल हा ज्यू पंथीय देश आहे. विशेष म्हणजे जगभरातील कोणत्याही ज्यू व्यक्तीला इस्रायलचे नागरिकत्व मिळते. याउलट पाकिस्तान आणि बांगलादेशातील हिंदूंची स्थिती आहे. आज ना उद्या नागरिकत्व मिळेल, नोकरी-धंदा मिळेल, मुलांना शालेय शिक्षण मिळेल, या आशेने कित्येक हिंदू शरणार्थी दिल्लीत कडाक्याच्या थंडीतही रस्त्यावर झोपड्यांमध्ये राहत आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येक शुक्रवारच्या सायंकाळपासून ते शनिवारी रात्रीपर्यंत ज्यू पंथीयांचा शबात हा धार्मिक काळ असतो. त्यावेळी तेथील लोक दान-धर्म करतात. या काळात व्यवसाय केल्यास त्यातून नफा मिळवल्यास तो दान-धर्मात वर्ग करावा लागतो. तेथे मुला-मुलींना सैन्य प्रशिक्षण सक्तीचे आहे. तेथील मुलेही प्रसंगी उच्च शिक्षणात तडजोड करूनही राष्ट्ररक्षणार्थ सैन्यप्रशिक्षण घेतात. त्यामुळे हे राष्ट्र आज जागतिक राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. हे सारे आता सांगण्याचे कारण म्हणजे 15 जानेवारी या दिवशी इस्रायल आणि भारत यांच्यात 9 विविध करार झाले आहेत. यापूर्वीही जगातील कोणतेच देश भारताला शस्त्रसामग्री विकण्यास राजी नव्हते, तेव्हा साहाय्य केले ते रशिया आणि इस्रायल यांनीच! अद्यापही वर्षाला 67 अब्ज ते 100 अब्ज रुपयांची सैन्यउत्पादने इस्रायल भारताला निर्यात करत आहे. याचाच दुसरा अर्थ आपल्यापेक्षा एवढे लहान राष्ट्र असूनही आपण गेली अनेक वर्षे त्याच्याकडून हे सारे आयात करत आहोत. पाकव्याप्त काश्मीर ही जशी भारताची समस्या आहे, तशी इस्रायलची गाझापट्टी होती.

पॅलेस्टाइनकडून त्या परिसरात होणारी आक्रमणे रोखण्यासाठी केवळ पॅलेस्टिनी आतंकवाद्यांचाच नाही, तर त्यांना साहाय्य करणार्‍यांचाही इस्रायलने निःपात केला होता. भारत सध्या पाकिस्तान, चीन, बांगलादेशी घुसखोर, अंतर्गत आतंकवाद यांनी पोखरला आहे. त्यामुळे आता आपण इस्रायलची रणनीतीही आयात करणे आवश्यक आहे. केवळ शस्त्रे आणि व्यापारी संबंध दृढ करण्यापर्यंत मर्यादित न राहता प्रतिकूलतेत विजिगीषू वृत्ती, शिस्तप्रिय नागरिकांचे राष्ट्रप्रेम हेही आयात केल्यास भारत खरोखरंच महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही. पाक, चीन, बांगलादेश आदी देशांना इस्रायली पद्धतीने धडा शिकवल्यास पुन्हा भारताकडे डोळे मोठे करून पाहण्याचे धाडस होणार नाही. भारताला गेली अनेक वर्षे कुख्यात दाऊदच्या मुसक्या बांधणे शक्य झालेले नाही. इस्रायलची विश्‍वविख्यात गुप्तहेर संघटना मोसादचे साहाय्य घेऊन त्याचाही ठावठिकाणा शोधता येऊ शकतो.

नित्रानंद भिसे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8424838659