इस्त्रायलप्रमाणे भारताने आक्रमकता दाखवावी!

0

नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलचा ऐतिहासिक दौरा केला. स्वातंत्र्यानंतरच्या 69 वर्षांत आतापर्यंत एकही पंतप्रधान इस्त्रायलच्या दौर्‍यावर गेेलेला नाही. यामागे भारतातील अल्पसंख्याकांना दुखवू नये, हे कारण होते. 13 इस्लामी राष्ट्रांना पराभूत करून इस्त्रायलने वेगळे राष्ट्र निर्माण केले होते. त्यामुळे मुसलमानांचा त्याला प्रचंड विरोध आहे. या एकमेव कारणामुळे त्याच्याशी संबंध ठेवण्यात आले नाहीत. मात्र, वर्ष 1992मध्ये काँग्रेसचे पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी हे संबंध प्रस्थापित केले. त्यानंतरही 25 वर्षांत एकही पंतप्रधान इस्त्रायलच्या दौर्‍यावर गेला नाही. तत्पूर्वी इस्त्रायलचे पंतप्रधान वर्ष 2003 मध्ये भारतात येऊन गेले. इस्त्रायलच्या दौर्‍यावर जाणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. भारतात मोठ्या संख्येने ज्यू राहतात. इस्त्रायलमध्येही सहस्त्र भारतीय राहत आहेत. इस्त्रायल आणि भारत यांच्यात आधीपासूनचे सांस्कृतिक संबंध आहेत. इस्त्रायलविषयी भारतीयांमध्ये आपुलकीची आणि जवळीकतेची भावना होती. इस्त्रायलनेही त्याच्याकडून केवळ अमेरिकेचे राष्ट्रपती, ख्रिस्तांचे धर्मगुरू पोप आदींना देण्यात येणारा सर्वोच्च पाहुण्यांचा मान मोदी यांनाही दिला.

इस्त्रायलच्या भेटीतून आंतरराष्ट्रीय स्तरावर काही घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अरब देशांचा इस्त्रायलला विरोध आहे. भारताने इस्त्रायलशी अधिकृत जवळीक न ठेवल्याने अरब राष्ट्रांकडून भारताला चांगले सहकार्य मिळत होते. आता इस्त्रायलशी वाढलेल्या जवळिकीमुळे अरब राष्ट्रांची प्रतिक्रिया कशी उमटते, हे पाहावे लागणार आहे. इस्त्रायलला जाण्यापूर्वी मोदी अमेरिकेत गेल्यावर चीनने थयथयाट केला होता तसेच इराणने काश्मिरी मुसलमानांना साहाय्य करा, असे आवाहन देशातील मुसलमानांना केले होते, अशी प्रतिक्रिया इस्लामी देशांतून अद्याप उमटली नाही. मात्र, भारतातील अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करणार्‍या राजकीय नेत्यांकडून यावर टीका केली जात आहे. मात्र, ती कोणत्याही खिजगणतीत नाही, हेही तितेकच खरे!

जागतिक राजकारणाच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी यांची धोरणे अत्यंत आक्रमक आणि व्यापारी वृत्तीची आहेत, असेच आतापर्यंतच्या त्यांच्या परदेश दौर्‍यातून दिसून आले आहे. भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अमेरिका, रशिया, फ्रान्स आदी देशांच्या दौर्‍यातून विविध शस्त्रास्त्रांच्या खरेदीचे करार झाले आहेत. इस्त्रायलमध्येही विविध करार झाले. विशेषतः इस्त्रायलची क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा जगात अत्यंत प्रगत मानली जाते. भारत त्याच्याकडून ही यंत्रणा घेणार आहे. इस्त्रायलने यापूर्वी भारताला विविध शस्त्रे विकत दिलेली आहेत.

इस्त्रायलप्रमाणे व्यक्तीला सैनिकी प्रशिक्षण अनिवार्य
इस्त्रायल भेटीत मोदी यांनी पहिल्याच दिवशी आतंकवादाशी लढण्याचे आवाहन केले. इस्त्रायल गेली 69 वर्षे इस्लामी राष्ट्रांच्या आतंकवादाशी लढतच आहे. इस्त्रायलचे महत्त्व त्याच्या आक्रमक आणि प्रखर राष्ट्रप्रेमामुळेच आहे. त्याच्या बळावरच 85 लक्ष ज्यूंचा इस्त्रायल देश निर्माण झाला आणि चारही बाजूंनी इस्लामी राष्ट्रांनी घेरूनही त्यांच्या नाकावर टिच्चून तो उभा आहे. हा भाग भारत कधी शिकणार आहे?

भारत, इस्त्रायल आणि चीन हे तिन्ही देश जवळपास एकाच वेळेस स्वतंत्र झाले. परंतु, अन्य दोघांच्या तुलनेत भारत अद्यापही मागास आहे. मोदी यांच्या भेटीने नवीन पर्वास प्रारंभ झाला आहे, तर आता इस्त्रायलकडून केवळ शस्त्रास्त्रे विकत घेण्यापेक्षा त्याच्याकडे असणारी युद्धनीती आणि प्रखर राष्ट्रप्रेम आत्मसात करायला हवे अन् ते देशातील प्रत्येक नागरिकांत कसे रुजेल हे पाहायला हवे. इस्त्रायलमध्ये प्रत्येक व्यक्तीला सैनिकी शिक्षण सक्तीचे आहे.भारतही आता बलाढ्य चीन आणि आतंकवादी राष्ट्र असणार्‍या पाकिस्तानसारख्या शेजार्‍यांनी वेढलेला देश आहे. अशा वेळी इस्त्रायलसारखी आक्रमकता भारतीयांमध्ये निर्माण झाली पाहिजे. बांगलादेशातून होणारी घुसखोरीही नष्ट झाली पाहिजे. इस्त्रायलकडून शत्रूच्या विरोधातील आक्रमकता भारत शिकला, तरच भेटीचे सार्थक होईल!
–  अभय वर्तक
प्रवक्ता, सनातन संस्था
7775858387