नवी दिल्ली : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ डॉ. यू.आर. राव यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. मृत्युसमयी ते 85 वर्षांचे होते.
भारताचा पहिला उपग्रह असलेल्या ‘आर्यभट्ट’च्या निर्मितीत राव यांचे मोठे योगदान होते. हृदयाच्या व्याधीमुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर पहाटे 2.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
उडुपी रामचंद्र राव यांचा जन्म कर्नाटकातील अदमारू या खेडेगावात 10 मार्च 1932 रोजी टक्ह सर्वसामान्य कुटुंबात झाला होते. त्यांचे प्राथमिक शिक्षण म्हैसूरमध्ये पुर्ण झाले. त्यानंतर मद्रासला विज्ञानात पदवी बनारास हिंदू विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी व गुजरात विद्यापीठातून त्यांनी पी. एच.डी पर्यंत शिक्षण पूर्ण केले.नंतर ते अवकाशयनांच्या अभ्यासासाठी अमेरिकेत गेले होते. राव यांच्या नेतृत्वात 1975 मध्ये ‘आर्यभट्ट’ सोबत 20 हून अधिक उपग्रह निर्माण करून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. राव यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल यावर्षी जानेवारीत ‘पद्म विभूषण’ पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे.