इस्रोची जूनमध्ये नवी भरारी

0

नवि दिल्ली । भारत पुढील महिन्यात सर्वात शक्तीशाली रॉकेट सोडणार आहे. 4 टन वजनाचे संदेशवहन करणारे उपग्रह वाहून नेण्याची क्षमता या रॉकेटमध्ये असणार आहे. भारत पहिल्यांदाच अशाप्रकारचे रॉकेट अवकाशात सोडणार आहे. यामुळे संदेशवहन आणि संपर्क क्षेत्रात मोठी क्रांती घडणार आहे. ‘जीएसएलव्ही मार्क 3 चे प्रक्षेपण पुढील महिन्यात करण्यात येणार आहे. यासाठीची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. यासाठीची संपूर्ण सामग्री श्रीहरिकोटा येथे आहे,’ अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष ए. एस. किरण कुमार यांनी दिली.

जागतिक स्तरावरील कोट्यवधींची अंतराळ बाजारपेठ आणि इतर देशांवरील अवलंबत्व कमी करण्यासाठी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जीएसएलव्ही मार्क 3 चे प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोने दिली आहे. जीएसएलव्ही मार्क 3 चे प्रक्षेपण यशस्वी ठरल्यास इस्रोच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल. यासोबतच भारत अंतराळ क्षेत्रात स्वयंपूर्ण होण्यात आणखी एक पाऊल पुढे टाकेल.

सध्या इस्रोच्या रॉकेटची क्षमता 2.2 टन वाहून नेण्याइतकी आहे. यापेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची कामगिरी इस्रोच्या रॉकेट्सना अद्याप करता आलेली नाही. 2.2 टनापेक्षा अधिकच्या वजनाचे उपग्रह वाहून नेताना भारताकडून कायम इतर देशांचा आधार घेतला जातो. परदेशांवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आता इस्रोकडून प्रयत्न केले जात आहेत.