इस्रोचे वजनदार यश! जीएसएलव्ही मार्क-3 चे यशस्वी प्रक्षेपण

0

श्रीहरिकोटा । भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने आज अंतराळ संशोधनात वजनदार यश मिळवले आहे. इस्त्रोचा जीएसएलव्ही मार्क-3 हा प्रक्षेपक आज संध्याकाळी पाच वाजून 28 मिनिटांनी यशस्वीरीत्या अंतराळात झेपावला. या प्रक्षेपकाद्वारे जीसॅट-19 या उपग्रहाचे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले.

जीएसएलव्ही मार्क -3 च्या यशस्वी प्रक्षेपणामुळे भारत अंतराळ संशोधनामध्ये अधिक सक्षम झाला आहे. आता भारताला वजनदार उपग्रह अंतराळात सोडण्यासाठी दुसर्‍या देशांवर अवलंबून राहावे लागणार नाही. तसेच चार टनांहून जास्त वजनाच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करणे भारताला शक्य होणार आहे. यामुळे भारतासमोर अनेक संधी निर्माण होणार आहेत. जास्त वजनाचे कम्युनिकेशन सॅटेलाईट जीएसएटी – 19 चा जिओटीमध्ये (जियोसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट) प्रवेश करणे जीएसएलव्ही मार्क -3 चे प्रक्षेपण करण्यामागचा मुख्य उद्धेश असल्याचे इस्त्रोचे चेअरमन ए. एस. किरण कुमार यांनी सांगितले. तसेच जीएसएलव्ही मार्क -3 चे प्रक्षेपण करण्यासाठी जास्त वेगाच्या क्रायोजेनिक इंजिनाचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे इस्त्रोने तब्बल 30 वर्ष संशोधन करत हे इंजिन तयार केले आहे.

हे प्रक्षेपण इस्त्रोसाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचे माजी प्रमुख राधाकृष्णन यांनी सांगितले आहे. कारण या प्रक्षेपणाद्वारे इस्त्रो प्रक्षेपण उपग्रहाची क्षमता 2.2 – 2.3 टनच्या दुप्पट करत 3.5 – 4 टन करत आहे. भारताला जर आज 2.3 टन वजनापेक्षा जास्त संपर्क उपग्रहाचे प्रक्षेपण करायचे असल्यास त्यासाठी परदेशात जावं लागते, अशी माहिती राधाकृष्णन यांनी दिली.