नवी दिल्ली – भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रो आज पूर्णतः व्यावसायिक सॅटेलाईट लॉन्च करणार आहे. दोन ब्रिटीश उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही-सी 42 श्रीहरिकोटा येथून अंतराळात झेपावणार आहे.
नोव्हा एसएआर आणि इंग्लंडच्या सरे सॅटेलाईट टेक्नॉलॉजी लिमिटेडच्या एस वन-फोर या पृथ्वीचे निरिक्षण करणाऱ्या उपग्रहांना वाहून नेणारे इस्त्रोचे पीएसएलव्ही-सी 42 हे यान श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवर उड्डाणासाठी तयार होत आहे. रविवारी 16 सप्टेंबर रात्री 10 वाजून सात मिनिटांनी यांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचे वजन 800 किलोग्राम आहे.
इस्रोचे अध्यक्ष के. शिवन यांनी याआधी इस्रो सात महिन्यात 19 अभियाने राबवणार असल्याची माहिती दिली होती. त्यामध्ये 10 सॅटेलाइटच्या प्रक्षेपणासह 9 यान प्रक्षेपित करण्यात येणार आहेत. सप्टेंबर ते मार्च या महिन्यात या मोहिमा राबवण्यात येणार आहेत. पीएसएलव्ही-सी42 च्या प्रक्षेपणाने 16 सप्टेंबरपासून या मोहिमेची सुरुवात होणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बाहुबली नावाने जीएसएलव्ही एमके 3-डी 2 या रॉकेटचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तसेच पीएसएलव्ही सी 43 याचेही प्रक्षेपण ऑक्टोबरमध्ये होणार आहे. जी सॅट 7 ओ आणि जी सॅट 11 या उपग्रहांचे नोव्हेंबरमध्ये प्रक्षेपण करण्यात येणार आहे. तर डिसेंबरमध्ये पीएसएलव्ही सी 44 आणि जीसॅट 31 अंतराळात सोडण्यात येणार आहेत. 2019 या नवीन वर्षात इस्रोची बहुप्रतीक्षीत चांद्रयान 2 मोहीम 3 ते 16 जानेवारीदरम्यान सुरू होणार आहे.