लाखो रूपयांचा प्लॅस्टिक माल जळून खाक
परीसरातील तरूणांचे शर्तीचे प्रयत्न
जळगाव – शहरातील गजबजलेल्या इस्लामपुरा भागात एका तीन मजली इमारतीला रविवारी रात्री ८ वाजता आग लागली. यात लाखो रूपयांचे प्लास्टिकची खेळणी, ज्वेलरी, कटलरीचे साहित्य जळून खाक झाले आहे. हनीफ शाह मस्तान शाह (रा.सालारनगर) याच्या मालकीची ही इमारत आहे. दरम्यान तरुणांनी एकत्र येऊन मनपा आणि जैन अग्निशमन विभाग व पोलीसांनी मदतीने शेजारच्या इमारतीवर चढून अडीच तासांत पाणी मारून ही आग आटोक्यात आणली. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. हनीफ शाह मस्तान शाह (रा.सालारनगर) यांच्या मालकीची ही इमारत आहे. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर प्लास्टिकची खेळणी, बेन्टेक्स ज्वेलरी, कटलरी सामान आदींची होलसेलची दुकाने आहेत. तर वरच्या दोन्ही मजल्यांवर सामानाचे गोडाऊन आहे. दरम्यान सायंकाळी 8 वाजेच्या सुमारास ही आग लागल्याने परीसरात खळबळ उडाली होती. यावेळी आग पाहून नागरीकांनी घरातील कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम केले तर काहींनी घरातील सिलेंडर आगोदर काढले.
नागरीकांचा मोठा गोंधळ
इस्लामपुरा हा भाग दाटीवाटीचा आहे. त्यामुळे नागरिकांचा मोठा गोंधळ उडाला होता. आग इतरत्र पसरुन मोठा अनर्थ होऊ नये म्हणून नागरिकांनी सुरुवातीला महिला, लहान मुले व वृद्धांना सुरक्षितस्थळी हलवले. त्यानंतर तरुणांनी मदतकार्यास सुरुवात केली. तसेच अनेक नागरिकांनी घरातील गॅसचे सिलिंडर बाहेर आणून सुरक्षित ठेवले.
पोलीस कर्मचारी आले धावून
घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. आमदार सुरेश भोळे, अपर पोलिस अधीक्षक लोहित मतानी, पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, शनिपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक विठ्ठल ससे, वाहतूक शाखेचे देवीदास कुनगर, सागर शिंपी यांच्यासह सर्व पोलिस ठाण्यांच्या गुन्हे शाेध पथकाचे कर्मचारी दाखल झाले होते. त्यांनी गर्दी पांगवून अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केले.
तरूण आले मदतीला
इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आगीचे लोट पसरत असल्यामुळे जमिनीवरुन पाणी मारण्यास अडचण येत होती. शाहरुख कुरेशी, इरफान नुरी, नाजीम पहेलवान, आशिम खाटीक, रहिम बापू यांच्यासह काही तरुण थेट आगग्रस्त इमारतीत शिरले. या तरुणांनी आगीची झळ सहन करून वरच्या मजल्यावरुन अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मदत केली. पोलिस कर्मचाऱ्यांनी देखील त्यांना आग विझवण्यासाठी सहकार्य केले.