ईटारसी पॅसेंजर तातडीने सोडल्यास सुटणार तिढा

0

खासदार रक्षा खडसेंनी रेल्वे प्रशासनाकडे करावा पाठपुरावा ; रेल्वे प्रशासनानेही घ्यावी दखल

रावेर- ईटारसी पॅसेंजर सुरुवातीला सुरत पॅसेंजरला कनेक्ट करण्यात आल्याने जळगाव जाण्यासाठी रावेर भागातील नोकरदारांसह प्रवाशांची मोठी सोय झाली होती मात्र इटारसी पॅसेंजर अनियमित धावत असल्याने रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खासदार रक्षा खडसे यांनी या प्रश्‍नी लक्ष घालून समस्या सोडवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळावा
गत चार वर्षांपासून सचखंड, महानगरी एक्सप्रेस गाड्यांना रावेर रेल्वे स्थानकावर थांबा देण्याची मागणी असून मात्र खासदार रक्षा खडसे यांनी पाठपुरावा करावा, अशी अपेक्षा आहे. रावेर, वाघोडा, सावदा, निंभोरा, दुसखेडा येथील प्रवाश्यांची वाढती नाराजी लक्षात घेता खासदारांनी इटारसी-भुसावळ पॅसेंजरवर भुसावळ-सुरत पॅसेंजरला कनेक्ट केल्याने हजारो प्रवाशांना जळगावला जाणे सोईचे झाले होते परंतु काही दिवसांपासून पॅसेंजरची समस्या जैसे-थे झाली आहे. ईटारसी पॅसेंजर उशिराने धावत असल्याने चाकरमान्यांना जळगाव गाठणे खर्चिक व गैरसोयीचे ठरत आहे.

ईटारसी पॅसेंजरला सुरत पॅसेंजर कनेक्ट हवी
इटारसी-भुसावळ पॅसेंजरने सकाळी वाघोडा, रावेर, निंभोरा, सावदा, दुसखेडा भागातील हजारो प्रवासी शिक्षणासाठी, रोजगारासाठी, दवाखान्याच्या कामासाठी भुसावळ येथे येतात व येथून जळगावपर्यंत सुरत पॅसेंजरने प्रवास करतात मात्र काही कारणास्तव ईटारसी पॅसेंजरला उशीर झाल्यास भुसावळ-सुरत पॅसेंजर निघून जात असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप होतो शिवाय बसभाडे खर्चून जळगाव गाठावे लागते वा दुसरी गाडी येईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते. ही गैरसोय टळण्यासाठी ईटारसी-भुसावळ पॅसेंजर प्लॅटफॉर्मवर आल्याशिवाय सुरत पॅसेंजर सोडण्यात येवू नये, अशी मागणी या भागातील रेल्वे प्रवाशांनी केली आहे.

तातडीने सोडावी ईटारसी पॅसेंजर
ईटारसी-भुसावळ पॅसेंजर दोन तास खंडवा येथे थांबून असल्याने तातडीने ते तेथून सोडल्यास प्रश्‍न सुटणार आहे. खासदार रक्षा खडसे यांच्याकडेदेखील आपण तक्रार केल्याचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन म्हणाले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता महानगरी, सचखंड, पुणे-पटना गाडीला रावेर येथे थांबा देण्यात यावा, असेही ते म्हणाले.

खासदारांकडून प्रवाशांना अपेक्षा
रावेर स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळवण्यास खासदारांना यश आले नसलेतरी वेळेवर ईटारसी पॅसेंजर चालवण्याईतपत किरकोळ समस्या सोडवणे कठीण नाही. हजारो प्रवाशांना रोजगारासह विविध कामासाठी जळगाव जावे लागते व त्यांच्या अडचणी लक्षात घेता हा प्रश्‍न सोडवावा, असे प्रवासी सल्लागार संघटनेचे प्रशांत बोरकर म्हणाले.

प्रवाशांना आंदोलनाशिवाय पर्याय नाही
एक्सप्रेस गाड्यांना रावेर स्थानकावर थांबा देणे गरजेचे असून पॅसेंजर वेळेवर चालवण्यासाठी निवेदन देऊन प्रवासी त्रस्त झाले असून यापुढे आंदोलन करण्याशिवाय प्रवाशांना पर्याय नाही, असे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील म्हणाले.