मुंबई: मराठा समाजातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (एसईबीसी) उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ शैक्षणिक प्रवेश व सेवाभरतीसाठी देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. या निर्णयाचा फायदा एसईबीसी वर्गात येणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थी व उमेदवारांना होईल. दरम्यान यावरून मराठा समाजाचे नेते खासदार संभाजीराजे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ईडब्ल्यूएसमधून आरक्षण देऊन राज्य सरकारकडून दिशाभूल सुरु आहे अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. माझा ईडब्ल्यूएसला विरोध नाही पण काही गडबड व्हायला नको, काही गडबड झाली तर राज्य सरकारच त्याला जबाबदार राहील असेही खासदार संभाजीराजे यांनी म्हटले आहे.
ईडब्ल्यूएसचा मराठा समाजाला फारसा लाभ होणार नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेली स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने चांगले प्रयत्न करावे असेही त्यांनी सांगितले आहे.