मुंबई : पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांच्या जावयाला अटक केल्यानंतर ईडीने एकनाथराव खडसे यांना समन्स बजावलेलं आहे. ईडीने आज आज खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, अचानक त्यांची प्रकती बिघाडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनं याबद्दलची माहिती दिली आहे. त्यामुळे ईडीसमोर हजर होण्यापूर्वी एकनाथराव खडसे पत्रकार परिषद घेणार होते. ही पत्रकार परिषदही रद्द करण्यात आली आहे. आता खडसे चौकशीसाठी हजर राहणार की ईडीकडे चौकशीसाठी वेळ वाढवून मागणार?, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
पुण्याजवळील भोसरी येथील औद्योगिक वसाहतीतील एका भूखंड प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा ‘ईडी’ला संशय आहे. या भूखंडाची खडसे यांनी २०१६मध्ये गिरीश चौधरी यांच्या नावे फक्त ३.७५ कोटी रुपयांची खरेदी केली होती. त्यामुळे या व्यवहारात मोठा गैरव्यवहार झाला असल्याचा संशय ‘ईडी’ला आहे. या प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून सोमवारी सकाळी चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. त्यानंतर एकनाथराव खडसे यांनादेखील समन्स बजावण्यात आलेलं असून, त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे.