ईद-उल-जोहा अर्थात ईदुल अजहा म्हणजेच कुर्बानीची ईद

0

ईद-उल-जोहा या उत्सवाला बकरी ईददेखील म्हणतात. इस्लामविषयी माहिती नसलेल्या अनेक लोकांचे या सणाविषयी बरेच गैरसमज आहेत, तर काही जातीयवादी लोकांनी मुद्दामहून गैरसमज पसरवून दिले आहेत. सामाजिक सलोखा प्रस्थापित होऊन शांती-समाधानाने जीवन जगण्याकरिता एकमेकांना समजून घेणे आवश्यक आहे आणि त्यासाठी एकमेकांविषयी असलेल्या गैरसमजांचा गाळ उपसणे गरजेचे आहे.

ईद-उल-जोहाविषयी सर्वात मोठा गैरसमज म्हणजे या सणानिमित्त पशूंचा बळी दिला जातो. खरं म्हणजे या सणाला बळी नव्हे, तर कुरबानी दिली जाते. आता बळी अन् कुर्बानीत फरक काय? बळी म्हणजे एखादा नवस फेडण्याकरिता एखाद्या माणसाच्या नावाने पशूला मारून त्याचे मांस त्याच्या देवतांना नैवेद्य म्हणून देणे, असे सर्वसाधारपणे मानले जाते. परंतु, कुर्बानीमागे एक फार मोठा इतिहास आहे.

तो इतिहास असा आहे : प्रेषित मुहम्मद (सल्अम्) यांच्यापूर्वी एकहजार नऊशे तीस वर्षांपूर्वी म्हणजे इ.स. पूर्व 1861मध्ये (आजपासून 3,875 वर्षांपूर्वी) इराकमध्ये प्रेषित इब्राहिम यांचा जन्म झाला. त्यांचे पुत्र इस्माईल हेदेखील प्रेषित होते. त्या काळात अंधश्रद्धा, वाईट रीती-रुढी, चाली, मूर्तिपूजा या कर्मकांडांनी थैमान घातले होते. स्वयंघोषित मध्यस्थ पुरोहितांना मोठे स्थान प्राप्त झाले होते. राजप्रमुखही पुरोहितांचे ऐकत असत. प्रेषित इब्राहिम यांना ईश्‍वराकडून प्रेषित्व प्राप्त झाल्यानंतर त्यांनी समाजसुधारणेला सुरुवात केली. त्यांना सामाजिक परिवर्तन करून जगात क्रांती घडवायची होती. ईश्‍वराशिवाय कुणीही पूजनीय नाही हाच संदेश त्यांच्या परिवर्तनवादी चळवळीचा मुद्दा होता. अल्लाहने (ईश्‍वराने) या महान कुटुंबाला जे मिशन दिले होते ते मिशन चालवणार्‍यांनी गरज पडल्यास मोठ्यात मोठे दिव्य पार पाडण्याची तयारी ठेवावी, याचे लोकांसाठी एक उदाहरण अल्लाहला दाखवून द्यायचे होते. त्यासाठी प्रेषित इब्राहिम यांच्या कुटुंबीयांची परीक्षा घेण्याचा निर्णय अल्लाहने (ईश्‍वराने) घेतला.

तुमच्या सर्वात आवडत्या वस्तूची आहुती द्या, असा संकेत अल्लाहने वारंवार दिल्यावर प्रेषित इब्राहिम समजून गेले की अल्लाह कोणाची आहुती द्यायला सांगत आहे. जेव्हा तो मुलगा (प्रेषित इस्माईल) त्याच्यासोबत धावपळ करण्याच्या वयाप्रत पोहोचला तेव्हा हा (प्रेषित इब्राहिम) म्हणाला, बाळा! मी स्वप्नात असे पाहतो की, तुझा गळा कापत आहे, तेव्हा तुझे काय मत आहे? तो म्हणाला, बाबा! करून टाका ज्याचा आदेश दिला जात आहे. ईश्‍वर-इच्छेने तुम्ही मला दृढ असल्याचे पाहाल. शेवटी जेव्हा हे दोघेही (प्रेषित इब्राहिम व प्रेषित इस्माईल) ईश्‍वराला शरण गेले आणि इब्राहिमने लेकराला पालथे केले आणि आम्ही (अल्लाहने) साद दिली, हे इब्राहिम! तू स्वप्न साकार केलेस. आम्ही सत्कर्म करणार्‍यांनाच मोबदला देत असतो. निश्‍चितच ही एक उघड परीक्षा होती. आम्ही एक मोठी आहुती प्रतिदानात देऊन त्या मुलाची सुटका केली. आणि त्याला (आहुती देण्याच्या त्याच्या या परंपरेला) भावी पिढ्यांसाठी कायम ठेवले.

– अशफाक पिंजारी, जळगाव
9823378611