ईमानदार करदात्यांना मोदींचे मोठे गिफ्ट; कराच्या नव्या व्यवस्थेचे लोकार्पण

0

नवी दिल्ली : करदाता हा देशाचा कणा आहे. करदाते देत असलेल्या करातून देशाचा विकास होत असल्याने करदात्यांचा सन्मान आवश्यक आहे. त्याच भावनेतून स्वातंत्र्य दिनापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील करदात्यांना मोठे गिफ्ट दिले आहे. कर प्रणालीच्या नव्या व्यवस्थेचे आज लोकार्पण मोदींच्या हस्ते करण्यात आले. वेळेत कर भरणाऱ्या प्रामाणिक करदात्यांसाठी एक नवीन व्यासपीठ केंद्र शासनाने तयार केले आहे. मोदींनी ‘पारदर्शी कर व्यवस्था- ईमानदारांचा सम्मान’ प्लॅटफार्मचे उद्घाटन केले. पारदर्शक करप्रणाली या २१ व्या शतकातील नव्या व्यवस्थेचे लोकार्पण करण्यात आले असून आजपासून ती लागू होणार आहे.

गेल्या सहा वर्षांत आमच लक्ष्य़ सरकारी प्रणालीमध्ये महत्वाचे बदल करण्यावर राहिला आहे. आजपासून नवा प्रवास सुरु झाला आहे. देशाचा ईमानदार करदाता देशाच्या बांधणीसाठी मोठी भूमिका निभावत असतो. जेव्हा त्याचे आयुष्य सोपे होते, तेव्हा तो प्रगती करतो, यामुळे देशही प्रगती करू लागतो. आजपासून सुरु होणाऱ्या या सुविधेमध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी होणार असून अधिकाधिक कारभार चालविला जाणार आहे, असे मोदींनी यावेळी सांगितले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदींचे मिशन हे ईमानदार करदात्यांना पुरस्कार देणे आहे. यामुळे या प्रक्रियेत पारदर्शकता येईल. आयकर विभाग आणि करदात्यांमध्ये ताळमेळ असेल. गेल्या वर्षी कार्पोरेट कर 30 वरून 20 टक्के केला होता. आयकर विभागाने अनेक सुधारणा लागू केल्या आहेत. करदात्यांना सन्मान देणे ही पंतप्रधानांची इच्छा आहे असे सांगितले.

फेसलेस स्टेटमेंट, फेसलेस अपील आणि टॅक्सपेयर्स चार्टरची ही योजना असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यापैकी फेसलेस स्टेटमेंट आणि टॅक्सपेयर्सची सुविधा आजपासून सुरु होणार असून फेसलेस अपीलची सुविधा 25 सप्टेंबरपासून देशवासियांच्या सेवेत येणार असल्याचे मोदी म्हणाले.