ईव्हीएमच्या मुद्यावरून विरोधक एकवटले ; पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाणार !

0

नवी दिल्ली:ईव्हीएमच्या मुद्यावर आज नवी दिल्लीत विरोधी पक्षांची बैठक पार पाडली. या बैठकीत ईव्हीएमच्या छेडछाडीचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ५० टक्के पेपर ट्रेलची ईव्हीएम सोबत पडताळणी करण्याच्या मागणीसाठी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा विरोधी पक्षांनी दिला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी शनिवारी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची भेट घेऊन ईव्हीएम बरोबर छेडछाडीचा मुद्दा उपस्थित केला.

२१ राजकीय पक्षांनी ५० टक्के पेपर ट्रेलची पडताळणीची मागणी केली आहे असे त्यांनी सांगितले. व्हीव्हीपॅट प्रणालीमुळे मतदाराने कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे, त्याची माहिती मतदाराला समजते. व्हीव्हीपॅटवर डिसप्ले सात सेकंदांऐवजी फक्त तीन सेकंदांसाठी दिसतो असे काँग्रेसचे नेते अभिषेक मनु सिंघवी नवी दिल्लीत लोकशाही वाचवा पत्रकार परिषेदत म्हणाले.

निवडणूक आयोग आमच्या पारदर्शकतेच्या मागणीकडे लक्ष देत नाहीय. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जाण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही असे सिंघवी म्हणाले. व्हीव्हीपॅट स्लीप मोजत बसलो तर आम्हाला पाच पेक्षा जास्त दिवस लागतील असे निवडणूक आयोगाने सांगितले. त्यावर आम्ही मतमोजणीसाठी कर्मचारी संख्या वाढवा तुम्हाला पाच दिवस लागणार नाहीत असे त्यांना सांगितल्याचे सिंघवी म्हणाले.