राजकीय पक्षांच्या उपस्थित होणार मशीनची तपासणी
जिल्ह्यासाठी 9 हजार व्हीव्हीपीएटी मशीन
पुणे : पुढील वर्षी होणार्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपीएटी (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली जाणार आहे. मतदान केंद्रांवर 10 ते 12 तास ईव्हीएम मशीन चालू शकेल का? व्हीव्हीपीएटी मशीनमधून येणारी चिठ्ठी व्यवस्थित येते का? ईव्हीएम मशीनवर मतदानाकरिता बटण दाबल्यानंतर ज्या चिन्हासमोरील बटन दाबले. त्याच चिन्हाची चिठ्ठी व्हीव्हीपीएटी मशीनमध्ये दर्शविली जाते का? अशा शंकाचे निरसन आता होणार आहे. जिल्हा प्रशासनाने ईव्हीएम मशीनची तपासणी करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी निवडणूक आयोगाने पावले उचलली आहेत. निवडणूक पूर्णपणे पारदर्शी करण्यासाठी निवडणूक आयोगाने सुरुवातीला ईव्हीएम वापरण्यास प्रारंभ केला होता. यानंतर, ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी जोडले जाणार आहे. निवडणूक आयोगाने सर्व जिल्ह्यांना नवीन ईव्हीएम मशीन (बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट) आणि व्हीव्हीपीएटी मशीन दिले आहे. त्यानुसार पुणे जिल्ह्यासाठी 16 हजार 690 बॅलेट युनिट, 9 हजार 762 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी 9 हजार 762 मशीन दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी मशीन असणार आहे.
मशीनवर दिलेल्या मताची मिळणार प्रिंट
लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. राजकीय पक्षांकडून याविषयी विविध आरोप करण्यात आले होते. मशीनमध्ये सेंटींग केलेली आहे. त्यामुळे हा उमेदवार विजय झाला. कोणत्याही उमेदवारासमोरचे बटन दाबले तरी ठराविक पक्षाच्या उमेदवाराला मत मिळते, असे अनेक आरोप करण्यात आले होते. काही जणांनी याविषयीच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल केल्या होत्या. या सर्व पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने मतदाराने कोणाला मतदान केले, याची माहिती मतदाराला मिळण्यासाठी व्हीव्हीपीएटी या मशीनवर दिलेले मत प्रिंट स्वरुपात दिसण्याची व्यवस्था केलेली आहे. यामुळे मतदाराच्या आणि उमेदवारांच्या मनात कोणतीही शंका राहणार नाही.
मतदान प्रक्रिया पारदर्शी करण्याचे प्रयत्न
जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेली नवीन मतदान यंत्रे भोसरी येथील महाराष्ट्र वखार महामंडळाच्या गोदामात ठेवण्यात आली आहे. जिल्हा निवडणूक शाखेकडून 15 ऑक्टोबरपासून अभिरूप मतदान घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मशीन तपासणी करण्यात येत आहे. काही ईव्हीएम मशीनवर 500 इतक्या प्रमाणात मतदान घेण्यात येणार आहे. ही प्रक्रिया योग्य प्रकारे सुरू असल्याची तपासणी करण्यात येणार आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत अशा प्रकारे मतदान घेऊन जिल्ह्याला प्राप्त झालेल्या ईव्हीएम व व्हीव्हीपीएटी मशीनची तपासणी करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शी असून याबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी व ही प्रकिया पाहण्यासाठी सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या अध्यक्ष अथवा त्या पक्षाच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांनी दिली.