जळगाव : लोंढ्री ता. जामनेर येथील बुथ क्रमांक तीन वर इव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याने मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. यामुळे काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. उमेदवारांनी नवीन मशीनची मागणी केली. या बुथवर आतापर्यंत ७३ जणांनी मतदान केले आहे. नव्याने पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली आहे. या मतदान केंद्रावर दोन गटांत हाणामारी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील ६८७ ग्रामपंचायतीसाठी सकाळी ७.३० वाजता मतदानास सुरुवात झाली असून पहिल्या दोन तासांत ११.५६ टक्के मतदान झाल्याची माहिती महसूल उपजिल्हाधिकारी रवींद्र भारदे यांनी दिली आहे.
नंदुरबार : ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली असून सकाळपासूनच ग्रामीण भागांत मतदानाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यांत ६४ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी अकरा वाजेपर्यंत शहादा तालुक्यात २१ ग्रामपंचायतीसाठी २१ टक्के मतदान पार पडले. तर नंदुरबार तालुक्यात आठ ग्रामपंचायतींसाठी २० टक्के मतदान पार पडले. नवापूर तालुक्यात ११ ग्रामपंचायतींसाठी अकरा वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले आहे.
धुळे : धुळे तालुक्यातील कावठी या मतदान केंद्रावर गेल्या एक तासापासून मशिनमध्ये बिघाड झाल्यामुळे मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मतदान प्रक्रिया एक तासापासून खोळंबली आहे.