ईव्हीएमवरुन ‘महाभारत’! 

0

नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणूक निकालांनंतर विरोधकांनी उपस्थित केलेला कथित ईव्हीएम घोळाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निवडणूक आयोग आणि भाजपला सोमवारी जोरदार लक्ष्य केले. त्यांनी निवडणूक आयोगाला धृतराष्ट्राची उपमा दिली आणि भाजपला दुर्योधन म्हटले. मतदान यंत्रांमध्ये फेरफार होत असल्याचा आरोप सातत्याने होत असतानाही निवडणूक आयोग कुठलीही चौकशी करत नाही. त्यामुळे, कुठल्याही परिस्थितीत भाजपला जिंकवण्याचा विडाच त्यांनी उचलला आहे का, असा संशय निर्माण झाला आहे. निवडणूक आयोग धृतराष्ट्र झाला आहे. आपल्या मुलाला- दुर्योधनाला विजयी करण्यासाठी तो साम-दाम-दंड-भेद यापैकी कशाचाही वापर करायला मागे-पुढे पाहत नाही, असे जोरदार टीकास्त्र केजरीवाल यांनी डागले.

आयोगाच्या इशार्‍यावरूनच मतदान यंत्रांत फेरफार
रविवारी देशभरात विविध राज्यांमध्ये निवडणूक पार पडली. मतदानादरम्यान राजस्थानमधील धौलपूरमधील ईव्हीएम मशीनमध्ये गोंधळ असल्याचे लक्षात आले होते. कोणत्याही पक्षासमोरील बटण दाबल्यास मत भाजपलाच जात होते. यावरुन अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी भाजपवर निशाणा साधला. केजरीवाल म्हणाले, निवडणूक आयोग निवडणूक घेण्याचे नाटक का करत आहे. त्यापेक्षा सरळ भाजपचा विजय झाल्याचे जाहीर करावे. मग देशातील जनताच ठरवेल की कसे आंदोलन करायचे? भाजप आणि निवडणूक आयोगाने लोकशाहीचा खेळ मांडला आहे, असा आरोप त्यांनी केला. ईव्हीएममध्ये निवडणूक आयोगाच्या इशार्‍यावरच फेरफार होत असल्याचा संशय केजरीवालांनी व्यक्त केला. मी एक इंजिनियर असून, मशीनमध्ये फेरफार केले गेलेत असे दिसते. ईव्हीएम मशिनमधील सॉफ्टवेअर हॅक झाले असून निवडणूक आयोग याची चौकशी का करत नाही असा सवालच त्यांनी विचारला. धौलपूरमध्ये 18 मशिनमध्ये फेरफार झाले. मशिनचे सॉफ्टवेअर हॅक झाले, हे कोणी केले, कोणाच्या आदेशावरुन झाले याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

शेवटच्या श्‍वासापर्यंत लढत राहू : केजरीवाल
दिल्ली महापालिका निवडणुकीसाठी राजस्थानमधून मशीन येत आहेत. पण दिल्लीत 15 हजार मशीन उपलब्ध आहेत. दिल्लीतील मशीन वापरण्यात अडचण काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दिल्लीत 2006 ते 2013 पर्यंत मशीनचा वापर होत नाही. याऐवजी त्यापूर्वीच्या जुन्या मशीनचाच वापर केला जात आहे असा दावा त्यांनी केला. ईव्हीएममधील फेरफारीनंतर आप निवडणुकीत उतरणार की नाही असा प्रश्न पत्रकारांनी केजरीवाल यांना विचारला होता. यावर केजरीवाल म्हणाले, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत निवडणूक लढवू. दिल्ली महापालिका निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येने मतदान करून भाजपला धडा शिकवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काल अनेक भागांत पोटनिवडणुका झाल्या. त्यावेळी धौलपूरमधील 18 मतदान यंत्रांमध्ये फेरफार झाल्याचे निदर्शनास आले. ईव्हीएमचा कोड बदलण्यात आल्याचे उघड झाले आहे. तो कुणी बदलला, कधी बदलला आणि का बदलला?, याची चौकशी निवडणूक आयोग का करत नाही, असा प्रश्न केजरीवाल यांनी विचारला.