मानवी हक्क संरक्षण मंचातर्फे दिले निवेदन
पिंपरी : निवडणुका झाल्यानंतर प्रत्येक वेळी निवडणुकीत वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिनवर संशय व्यक्त केला जातो. त्यामुळे इव्हीएम रद्द करण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती मंचाने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी संस्थेचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, संस्थापक विकास कूचेकर, संगिता जोगदंड, मुरलीधर दळवी, शिवानंद तालीकोटी, पि. पि. पिल्ले आदी उपस्थित होते.
ईव्हीएम मशीनबाबत नागरिकांच्या मनात संशय
अण्णा हजारे यांना दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, निवडणुका झाल्या की प्रत्येक वेळी निवडणुकीत वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिन वर अनेक राजकीय पक्षाकडून व नागरिकांकडून संशय व्यक्त केला जातो. हे लोकशाहीतील मतदानाचा अधिकार बजावलेल्या नागरिकांचा अवमान आहे. म्हणून निवडणुकीतील ईव्हीएम मशीनबाबत नागरिकांच्या मनात संशय निर्माण होऊन उदासीनता निर्माण झाली आहे. हे दूर होणे लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सर्व निवडणुका भयमुक्त, निर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्याची घटनात्मक जबाबदारी निवडणूक आयोगावर आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने जनजाग्रती व प्रात्यक्षिकाद्धारे संशय दूर करावा किंवा ही ईव्हीएम मशिन पद्धत बंद करावी. त्यासाठी आपण निवडणूक आयोगाकडे पाठपुरावा करावा.