ईव्हीएम मशीनमध्ये फुलले दोनदा कमळाचे फूल

0

नवी दिल्ली । देशातील निवडणुकीदरम्यान मतदानासाठी वापरल्या जाणार्‍या ईव्हीएम मशीन्समध्ये गडबड असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांतील विधान सभेच्या निवडणुकीनंतर केला होता. मशीन्सचे कुठलेही बटण दाबले तरी मत भाजपलाच मिळत असल्याचे आरोप विरोधी पक्षाने केला होता. आता मध्य प्रदेशात होणार्‍या पोटनिवडणुकांसाठी घेण्यात आलेल्या ईव्हीएम मशीनच्या चाचणी दरम्यान कुठलेही बटण दाबले तरी भाजपलाच मत मिळत असल्याचे स्पष्ट झाल्यावर विरोधी पक्षांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

मध्य प्रदेशातील दोन ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी वोटर व्हेरीफाएबल पेपर ऑडिट ट्रायलची जोडणी असलेल्या ईव्हीएम वापरण्यात येणार आहेत. पुढील आठवड्यात होणार्‍या या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर शनिवार सर्व राजकीय पक्षांसाठी या मशीन्सचे प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. प्रात्यक्षिकादरम्यान दोन वेगवेगळी बटणे दाबल्यावर दोन्ही वेळा कमळाच्या फुलाचे चिन्ह असलेली पावती बाहेर आली. त्यामुळे काँगे्रससह आमआदमी पार्टीच्या पदाधिकार्‍यांनी निवडणूक आयोगातील अधिकार्‍यांची भेट घेऊन सगळ्या प्रकाराची माहिती दिली.

राज्य निवडणूक आयुक्तांची धमकी?
ईव्हीएम मशीनचे कुठलेही बटण दाबले तरी कमळाच्या फुलाची पावती येत असल्याचे उघड झाल्यावर मध्य प्रदेश निवडणूक आयुक्त सलीना सिंग यांनी पत्रकारांना ही बातमी छापू नये, असे सांगितले. तुम्ही हे बाहेर सांगितल्यास तुम्हाला पोलीस ताब्यात घेतील, असेही सलिना म्हणाल्या. पण, या घटनेच्या व्हिडीओमध्ये सलिना हसत असल्याचे दिसत असल्यामुळे त्यांनी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी थट्टा केली की, खरखरोच धमकी दिली, हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान, ही व्हिडीओ क्लिप विरोधी पक्षांनी केंद्रीय निवडणूक आयुक्तांकडेही पाठवली आहे.

आयोगाने अहवाल मागितला
निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने सांगितले की, जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांकडून अहवाल मागविण्यात आला आहे. व्हीव्हीपीटी मशीनच्या माध्यमातून मतदाराने कोणाला मत दिले आहे, हे समजते. मतदाराला केवळ 7 सेकंद ही पावती पाहता येते. त्यानंतर ही पावती डब्यात पडते. मतदाराला ही पावती घरी घेऊन जाता येत नाही.