ईव्हीएम, व्हीव्हीपीएटी मशीनची राजकीय पक्षांसमोर होणार चाचपणी

0

जिल्हा प्रशासनाला नवीन मशीन प्राप्त : जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांची बैठक

पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाकडे नवीन ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपीएटी मशीन प्राप्त झाल्या आहेत. या मशीनची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. सध्या ऑनलाईन प्रणालीमध्ये मशीनची नोंदणी घेण्याचे काम सुरू आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना बोलावून ईव्हीएम योग्य प्रकारे काम करत असल्याची चाचपणी घेतली जाणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात मतदार याद्यांचा विशेष पुनर्निरिक्षण कार्यक्रमांतर्गत राजकीय पक्षांची बैठक उपजिल्हा निवडणूक अधिकारी मोनिका सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. आगामी निवडणुकांसाठी ईव्हीएम मशीनचा वापर नको, अशी भूमिका काही राजकीय पक्षांनी घेतली आहे. ईव्हीएम मशीनच्या ऐवजी मतपत्रिकेवर मतदान घेण्याची मागणी होत आहे. या पार्श्‍वभूमीवर ईव्हीएम मशीनचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे.

प्रारुप मतदार यादी आज होणार प्रसिद्ध

मतदार नोंदणीच्या विशेष अभियानानंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. ही मतदार यादी शनिवारी (1 सप्टेंबर) प्रसिद्ध करण्यात येणार आहे. मतदारांची संख्या वाढल्याने आगामी निवडणुकांसाठी 132 नवीन मतदान केंद्रांची भर पडणार आहे. मतदार याद्यांमध्ये 1 जानेवारी 2019 पर्यंत वयाची 18 वर्षे पूर्ण करणार्‍या मतदारांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा निवडणूक शाखेने वेळोवेळी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिमा राबविल्या. त्यानुसार प्रारुप मतदार यादी तयार करण्यात आली आहे. मतदारांची संख्या वाढल्याने मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. जिल्ह्यात 7 हजार 534 मतदार केंद्रे होती. त्यामध्ये बदल होऊन 7 हजार 666 मतदार केंद्रे होणार आहेत. याबाबतची माहिती बैठकी देण्यात आली.

जिल्ह्यासाठी 9 हजार व्हीव्हीपीएटी मशीन

पुणे जिल्ह्यासाठी 16 हजार 690 बॅलेट युनिट, 9 हजार 762 कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपीएटी 9 हजार 762 मशीन दिले आहेत. प्रत्येक मतदान केंद्रांवर आता ईव्हीएमसोबत व्हीव्हीपीएटी मशीन असणार आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच व्हीव्हीपीएटी मशीनचा वापर होणार आहे. याची माहिती राजकीय पक्षांना होण्यासाठी तसेच मशीन योग्य प्रकारे काम करत असल्याची तपासणी लवकरच राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत केली जाणार आहे.

व्हीव्हीपीएटी प्रणालीचा वापर

निवडणूक विषयक कामकाजाची माहिती या बैठकीत राजकीय पक्षांना देण्यात आली. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्वच ठिकाणी ईव्हीएम मशीनसोबत व्हीव्हीपीएटी (व्होटर व्हेरिफिएबल पेपर ऑडिट ट्रायल) ही प्रणाली वापरली जाणार आहे. त्यानुसार ईव्हीएम मशीनच्या बाजूलाच व्हीव्हीपीएटी जोडले जाणार आहे. ईव्हीएमवर मतदान केल्यानंतर बाजूला असलेल्या व्हीव्हीपीएटी मशीनच्या प्रिंटरवर मतदाराला आपण नोंदवलेले मत सात सेकंद दिसणार आहे.

प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी 1 सप्टेंबर
दावे, हरकती स्वीकारणे 1 ते 31 ऑक्टोबर
दावे, हरकती निकालात काढणे 30 नोव्हेंबरपूर्वी
मतदार यादी अद्ययावत करणे 3 जानेवारी 2019
अंतिम मतदार यादी प्रसिद्ध 4 जानेवारी 2019

दिव्यांगांसाठी तळमजल्यावर मतदान

दिव्यांग व्यक्तींना निवडणूक प्रक्रियेमध्ये सामावून घेणे आणि त्यांच्यात निवडणूकविषयक जागरुकता निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आगामी निवडणुकांमध्ये दिव्यांग व्यक्तींची मतदानाची व्यवस्था तळमजल्यावर केली जाणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत आहे. दिव्यांग व्यक्तींची मतदान केंद्रनिहाय माहिती संकलीत करण्याचे काम जिल्हा समाजकल्याण अधिकार्‍यांमार्फत केले जाणार आहे.