ईश्‍वरचिठ्ठीतून वाचलेल्यांची भाजपकडून ‘विकेट’!

0

राजीनामे घेतलेल्या स्थायीच्या भाजप सदस्यांना झटका
स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये पुन्हा रस्सीखेच

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना स्थायी समितीत संधी देण्याचे निश्‍चित केले आहे. ईश्‍वरचिठ्ठीद्वारे स्थायीतून भाजपचे सहा नगरसेवक बाहेर पडले होते. तर, चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समितीच्या भाजपच्या चार आणि एका अपक्ष नगरसेवकांचा राजीनामा महापौर नितीन काळजे यांनी शुक्रवारी मंजूर केला आहे. त्यामध्ये भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांचा समावेश आहे. दरम्यान, नव्या सदस्यांची आगामी महासभेत निवड केली जाणार आहे. त्यामुळे स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे.

5 वर्षांत 50 जणांना संधी देणार
महापालिका स्थायी समितीमध्ये 16 सदस्य आहेत. यामध्ये भाजपचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर त्यातील आठ सदस्य पहिल्या वर्षानंतर निवृत्त होतात. ती नावे चिठ्ठीद्वारे काढून निश्‍चित केली जातात. चिठ्ठीद्वारे तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, आशा शेंडगे, कुंदन गायकवाड, उषा मुंडे, कोमल मेवानी, हर्षल ढोरे हे भाजपचे सहा सदस्य समितीतून बाहेर पडले होते. बाहेर पडलेल्या सदस्यांच्या जागी नवीन सदस्यांची नियुक्ती झाली आहे. तर, भाजपचे लक्ष्मण उंडे, प्रा. उत्तम केंदळे, माधुरी कुलकर्णी आणि निर्मला कुटे, तसेच भाजपसोबत असलेले अपक्षांचे गटनेते कैलास बारणे स्थायी समितीमध्ये सदस्य म्हणून कायम राहिले होते. परंतु, चिठ्ठीतून नावे बाहेर काढण्याच्या अगोदर भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी भाजपच्या दहा आणि अपक्ष एक असा 11 नगरसेवकांचे स्थायी समिती सदस्यत्वाचे राजीनामे घेतले होते. स्थायी समितीत पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी राजीनामे घेतले असल्याचे पक्षाने स्पष्ट केले होते.

अध्यक्षपदाची निवडणूक होताच राजीनामे मंजूर
स्थायी समिती अध्यक्षपदाचा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अडचण येऊ नये यासाठी भाजपने चिठ्ठीतून वाचलेल्या स्थायी समिती सदस्यांचे राजीनामे मंजूर केले नव्हते. आता स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक पार पडली आहे. भाजपच्या ममता गायकवाड स्थायी समिती अध्यक्षा झाल्या आहेत. त्यामुळे पाच वर्षात पन्नास नगरसेवकांना संधी देण्यासाठी घेतलेले स्थायी समिती नगरसेवकांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले आहेत. त्यामुळे स्थायी समितीत भाजपच्या चार आणि अपक्षांची एक जागा रिक्त झाली आहे. रिक्त झालेल्या जागांवर नवीन सदस्यांची निवड आगामी महासभेत केली जाणार आहे. त्यामुळे स्थायीत जाण्यासाठी भाजप नगरसेवकांमध्ये रस्सीखेच निर्माण झाली आहे.