फैजपूर। देवाजवळ भौतिक सुविधा मागू नका, तो ते देणारही नाही. मागायचे असेल तर देवाजवळ देवच मागा, कारण या पुण्याईने मिळालेल्या मानव देहाद्वारेच उध्दार होणार. सोबत काही नेता येणार नाही. फक्त सोबत येईल ते देवांचे भजन गोपींनी कृष्णावर समर्पित भावाने भक्तीप्रेम केलं त्यानुसारच आपणही समर्पित भावाने प्रेम करावे असा सल्ला आचार्य जनार्दन हरिजी महाराज यांनी दिला. तराई दुर्गोत्सव मित्रमंडळ, खिरोदा यांच्यातर्फे आयोजित गोपीगीत सत्संगाच्या द्वितीय दिवसाला महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांनी भाविकांना गोपींच्या परमोच्च समर्पण भावाचे, भक्तीचे विचारदर्शन करुन दिले.
सजीव देखावा
कृष्णाच्या खोड्या सजिव देखाव्यासह मंडपात होत असताना प्रत्यक्ष गोकुळाचा आनंद भाविकांनी अनुभवला जीवनातील दुख: दूर करण्यासाठी देवावर निस्सीम प्रेम करा. जीवनाला आनंदरुप बनवा असा जीवनसंदेश स्वामीजींनी दिला. गोपींना फक्त नि फक्त कृष्णचं हवा होता. कृष्णाशिवाय त्यांना काही- काही नको होते. कृष्णाची मुर्ती त्यांनी त्यांच्या ह्रदयात निर्माण केली होती. कृष्णाचे खोड्या या गोपींसाठी कृष्णप्रसादच होता. कृष्णाविषयी प्रेम सदैव मनात रहावं हेच मागणं गोपी मागतात याशिवाय कृष्णाकडून काही नको आणि हिच भक्ती आपल्या अखेरच्या श्वासानंतरही सोबत येणार आहे. कोणतीही ताकद हा भक्तीचा ठेवा सोबत नेण्यासाठी रोखू शकत नाही. त्या कृष्णाची सुंदर नजर एकवेळ तरी आपल्यावर पडावी म्हणून गोपींची धडपड असायची आणि कृष्णाच्या एक नजरेने सार्या गोपी या गोपी न राहता कृष्णरुप होतात. असेही स्वामींनी सांगितले.