’सूर मिलाफ’ मैफलीला चांगला प्रतिसाद
पुणे : पाश्चिमात्य आणि भारतीय सुरांचा संगम असणार्या ’सूर मिलाफ’ या कार्यक्रमाचे मुळशीतील ’ढेपे वाडा’ येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. भारतीय संस्कृतीतील कला जोपासण्यासाठी तसेच वृद्धिंगत व्हावी यासाठी पूर्व आणि पश्चिमेकडील गायन आणि तालवाद्यांतील सुरांचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ’उदय ईस्ट-वेस्ट फ्युजन बॅण्ड’ ने हा कार्यक्रम सादर केला.
झेक रिपब्लिक देशातील जॉन कॅन्कले (सॅक्सोफोन-बासरी), विनीत अंतुरकर (गायन, गिटार), भूपाल लिमये (मेंडोलीन), नीरज प्रेम (कॅनडा), उदय रामदास (गायन,तबला) या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
आफ्रिकन संगीताची मेजवानी
जुन्या मराठी वाडा संस्कृतीप्रमाणे बांधलेल्या ढेपे वाड्याच्या आलिशान दिवाणखान्यात भारतीय बैठकीवर बसलेल्या रसिकांसमोर ही फ्युजन मैफिल रंगली. हंसध्वनी, चारुकेशी, खमाज या भारतीय रागदारीवर आधारीत रचना त्यांनी सादर केल्या. जॅझ, वेस्टर्न क्लासिकल रचनाही या कलाकारांनी सादर केल्या. आफ्रिकन, मराठी लोकसंगीतही रसिकांना मोहवून गेले. भैरवी रागाने मैफलीची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋचा ढेपे यांनी केले. ’ढेपे वाडा’चे संचालक नितीन ढेपे, ऋचा ढेपे यांनी कलाकारांचा सत्कार केला.