पुणे – ग्रामपंचायतीतून मिळणारे दाखले नागरिकांना घरबसल्या मिळावे यासाठी राज्य शासनाच्या वतीने पुणे जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतीमध्ये ई-ग्राम’ नावाचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्व नागरिकांना घरबसल्या 28 नाही तर तब्बल 33 प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दिली.
जिल्ह्यात 1407 ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी 880 ग्रामपंचायतींमध्ये आपले सरकार सेवा केंद्र आहे. या केंद्रांमध्ये दाखले देण्यासाठी संग्राम नावाचे सॉफ्टवेअर बसविण्यात आले होते. आता त्याऐवजी नव्याने ई-ग्राम सॉफ्टवेअर बसविण्यात आले आहे. 325 ग्रामपंचायतींमध्ये ते बसविण्यात आले असून, त्याचा ग्रामीण भागातील नागरिकांना नक्कीच फायदा होणार आहे. संग्राम सॉफ्टवेअरमध्ये 28 प्रकारचे दाखले काढता येत होते. आता या नवीन ई-ग्राम सॉफ्टवेअरमुळे रहिवाशांना 33 प्रकारचे दाखले उपलब्ध होणार आहे. ई-ग्राम’ सॉफ्टवेअरमुळे अर्जदार व्यक्तीचे नाव, कागदपत्रे अपलोड केल्यास दाखले मिळणार आहेत. त्यासाठी नोंदणी करावी लागणार आहे, तसेच लॉग इन’ करावे लागेल.
नव्या सॉफ्टवेअरद्वारे दाखल्याबरोबर विविध प्रकारच्या ग्रामपंचायतींमधील कामकाजातील नोंदीही करता येणार आहेत. त्यामध्ये व्यक्ती करपात्र आहे का, गावात किती वृक्ष आहेत, लोकसंख्या, ग्रामपंचायतीतील कर्मचारी संख्या आदी नोंदी ठेवाव्या लागतात. रहिवासी दाखला, दारिद्रय रेषेखालील दाखले, जन्म-मृत्यू दाखला, विवाह नोंदणी दाखला, शौचालय वापरत असल्याचा दाखला, ज्येष्ठ नागरिकांचा दाखला, विधवा असल्याचा दाखला, ग्रामपंचायतीचे येणे नसल्याचा दाखला, हयातीचा दाखला, 8 अ उतारा, विभक्त कुटुंब दाखला, निराधार दाखला अशा प्रकारचे दाखले ई- ग्राम या सॉफ्टवेअरद्वारे उपलब्ध होणार असल्याची माहिती कोहिनकर यांनी दिली.