पुणे – आगामी काळ हा विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा आहे. त्यामुळे याचा परिणाम प्रकाशन विश्वावर होणार आहे. प्रकाशकांनी पारंपारिकतेसोबतच भविष्याचा वेध घेत टेक्नोसॅव्ही होत, ई-पब्लिकेशनकडे वळले पाहिजे. असे मत राज्याच्या ग्रंथालय संचालनालयाचे संचालक किरण धांडोरे यांनी व्यक्त केले.
अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार यंदा अमरावती येथील पॉप्युलर बुक सेंटरचे नंदकिशोरजी बजाज यांना माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यावेळी वैष्णवी कुलकर्णी, राजीव बर्वे, शशिकला उपाध्ये, अविनाश पंडित, सुकुमार बेरी आदी उपस्थित होते.
धांडोरे म्हणाले, महाराष्ट्र शासनाचे धोरण देखील आगामी काळात ई-पब्लिकेशनला चालना देणारे असेच आहे. मुंबईत गेल्या 10 वर्षांत पुस्तकाचे एकही नवीन दुकान सुरू झाले नाही, ही चिंतेची बाब आहे. जिल्हास्तरावरील प्रकाशक, वितरक आणि विक्रेता जगला पाहिजे यासाठी पावले उचलली आहेत.