ई-पॉश यंत्र बंदमुळे खते खरेदीसाठी अडचणी

0

भुसावळ। शेतकर्‍यांना रासायनिक खत खरेदीसाठी आधार कार्डचा वापर करुन ई- पॉश मशीनच्या साहाय्याने प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. कृषी विभागाने तालुक्यात 30 पैकी 29 विक्रेत्यांना ही यंत्रणा उपलब्ध करुन दिली आहे. यापैकी सध्या केवळ सात ई- पॉस यंत्रे कार्यान्वित झाली असून उर्वरित 22 यंत्रे तांत्रिक समस्यांमुळे बंद आहेत.

30 विक्रेत्यांना मशिनची आवश्यकता
केंद्र शासनाने रासायनिक खत विक्रेत्यांना – पॉस (पॉइंट ऑफ सेल) ही यंत्रणा सक्तीची केली आहे. रासायनिक खते खरेदीसाठी आलेल्या शेतकर्‍यांचे आधार क्रमांक घेवून बोटाच्या ठशाने हे उपकरण कार्यान्वित करुन खतांची विक्री करता येणार आहे. भुसावळ तालुक्यातील 30 रासायनिक खत विक्रेत्यांना या मशिनची आवश्यकता होती.

आठ दिवसात दुरुस्ती
30 पैकी 29 विक्रेत्यांना ही यंत्रणा पुरवण्यात आली आहे. मात्र ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या आणि अन्य अनेक तांत्रिक अडचणी असल्याने समस्या निर्माण झाली आहे. यामुळे 29 पैकी केवळ सात पॉस यंत्रणा सध्या कार्यान्वित असून 22 यंत्रे बंद आहेत. येत्या आठ दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे.

बोगस विक्रीला आळा
भुसावळ तालुक्यात 29 विक्रेत्यांना मशीन दिले आहे. केवळ कठोरा विकासोला अद्याप ई-पॉश मशीन उपलब्ध झाले नाही. लवकरच मशीन उपलब्ध होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकर्‍यांच्या नावावर बोगस खतविक्री केली जात असल्यामुळे शासनाने याला आळा घालण्यासाठी ई- पॉश मशिनचा वापर करण्यास प्राधान्य दिले जात आहे.