भडगाव/फैजपूर । महाराष्ट्र शासनाच्या ई-फेरफार कार्यक्रमाअंतर्गत 1 ऑगस्ट, 2017 पासून सर्व सातबारा उतारे तलाठ्यांच्या डिजीटल स्वाक्षरीने ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. त्यापूर्वी खातेदारांना त्यांचा सातबारा पडताळणीसाठी व त्यात दुरुस्ती असल्यास आक्षेप नोंदविण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्या अनुषंगाने भडगाव व फैजपूर येथे संगणकीकृत सातबाराचे चावडी वाचनाचे आयोजन करण्यात आले. भडगाव तालुक्यात 16 मे ते 5 जून दरम्यान 4 मंडळस्तरावरील गावांमध्ये चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. याबाबत संबंधित तलाठी व मंडळ अधिकारी यांना आदेश देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व खातेदारांनी संबंधित तलाठी यांचेशी संपर्क करावा व आपल्या संबंधित सजेवर उपस्थित राहून चावडी वाचन कार्यक्रमात सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसिलदार सी.एम.वाघ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे. यावेळी तलाठी, मंडळाधिकारी उपस्थित होते.
63 गावांचे सातबारा संगणकीकरणाचे सरासरी कामकाज 99 टक्के पूर्ण
तालुक्यातील एकूण 63 गावांचे सातबारा संगणकीकरणाचे सरासरी कामकाज 99 टक्क्यापेक्षा अधिक झाल्याने या गावांमध्ये चावडी वाचनाचे नियोजन आहे. सातबारा संगणकीकरणाचे उर्वरित कामकाज तात्काळ पूर्ण करून महिनाअखेर शंभर टक्के काम पुर्ण करण्याचे नियोजन आहे. यासाठी मंडळ अधिकारी, तलाठी व महसूल प्रशासनास तालुक्यातील नागरिकांनी सहकार्य करावे असेही तहसिलदार वाघ यांनी कळविले आहे.
मंडळनिहाय चावडी वाचन
चावडी वाचनाच्या नियोजित कार्यक्रमात भडगाव मंडळातील 11 गावांचा समावेश करण्यात आला आहे. 20 मे ते 1 जून दरम्यान कोळगाव मंडळातील 15 गावांमध्ये, 16 मे ते 30 मे दरम्यान कजगाव मंडळातील 21 गावांमध्ये आणि दिनांक 18 मे ते 4 जून 2017 या कालावधीत आमडदे मंडळातील 16 गावांमध्ये मंडळनिहाय चावडी वाचन करण्यात आले.
सहभागाचे तहसीलदारांचे आवाहन
फैजपुर। सातबारा वरील नावाची नोंद योग्य आहे किंवा नाही हे प्रत्येक मालमत्ताधारकाने तपासून घ्यावे. याकरीता फैजपुर येथे चावडी वाचनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रभारी नगराध्यक्ष हेमराज चौधरी होते. यावेळी यावल तहसीलदार कुंदन हिरे, मंडलाधिकारी रशीद तडवी, तलाठी एस. एफ. खान, ओंकार सराफ,नामदेव होले,अशोक पाटील, अनिल वाढे,संजय राजपूत उपस्थित होते. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात विविध ठिकाणी वेळोचे नियोजन करून चावडी वाचन करण्यात येत आहे. या चावडी वाचन कार्यक्रमात प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
63 गावातील उतारे
भडगाव तालुक्यातील 63 गावांमधील एकूण सातबार्यांची संख्या ही 56 हजार 522 इतकी असून 56 हजार 167 इतक्या सातबार्यांचे संगणकीकरणाचे काम पुर्ण झाले आहे. संगणकीकरणाच्या कामाचा आवाका अधिक असल्याने सर्व नागरिकांनी स्वतःशी संबंधीत 7/12 वेबसाईटवरून डाऊनलोड करून अथवा तलाठी यांचेकडील अभिलेख पाहण्यासाठी चावडी वाचनात सहभाग घेण्याचे सांगण्यात आले आहे.