ई-बससाठी नगरसेवकांचे प्रयत्न

0

जास्तीत-जास्त मार्गांवर बसेस सोडण्याचे प्रशासनाचे प्रयत्न

पुणे : शहरात प्रथमच ई-बस धावणार असल्याने ती आपल्या प्रभागातून धावावी, अशी काही नगरसेवकांची इच्छा आहे. यासाठी काही नगरसेवकांकडूनही प्रयत्नही करण्यात आले. यावर पीएमपी प्रशासनाकडून दक्षता घेण्यात आली असून मार्गनिश्‍चिती करताना जास्तीत जास्त नगरसेवकांच्या वार्डातून बस धावेल, असा प्रयत्न करण्यात आला आहे.
पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी येत्या तीन ते चार दिवसांत ई-बसेस दाखल होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासनाने दोन्ही शहरांतील मार्ग निश्‍चित केले आहेत. दोन्ही शहरांसाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे कामही पूर्ण झाले आहे. राज्यातील कोणत्याच जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात ई-बसेस धावत नसून पुण्यात प्रथमच त्या धावणार आहेत. यामुळे त्याला मागणी जास्त असून आपल्या प्रभागातून ती धावावी यासाठी काही नगरसेवक प्रयत्नशील आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

येत्या काही महिन्यांत निवडणुका आल्या आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगरसेवकांच्या मागणीने जोर धरला आहे. पीएमपी प्रशासनानेही याचा विचार करत शहराच्या विविध भागातील चार मार्ग निश्‍चित केले आहेत. या माध्यामातून जास्तीत जास्त प्रभागातून बस धावेल, अशा मार्गाची निर्मिती करण्यात आली आहे. पिंपरी शहरातही याचा विचार करण्यात आला असून तीन वेगवेगळे मार्ग निश्‍चित करण्यात आले आहे. दरम्यान, इलेक्ट्रिक बसेसाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. येत्या तीन-चार दिवसांत शहरात बस दाखल होतील. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटन करण्यात येईल, असे पीएमपीच्या अध्यक्षांनी सांगितले.

नव्या 33 तेजस्विनी येणार

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेल्या तेजस्विनी बसेसही दाखल होण्याची शक्यता प्रशासकीय सूत्रांनी व्यक्त केली आहे. 33 पैकी किमान एका तेजस्विनीचे उद्घाटन मुख्यमंत्र्याचे हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती अधिकार्‍यांकडून देण्यात आली.