9 जानेवारीपर्यंत स्विकारणार निविदा
पुणे : स्मार्ट सिटीअंतर्गत खरेदी करण्यात येणार्या ई-बससाठी दुसर्यांदा निविदा मागविण्यात आल्या आहेत. यापूर्वी मागविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने नव्याने प्रसिद्ध करण्यात आली असून 9 जानेवारीपर्यंत स्विकारण्याची मुदत देण्यात आली आहे.
स्मार्ट सिटीअंतर्गत शहरातील वाहतूक व्यवस्थेत ई-बस खरेदी करण्याचा निर्णय पीएमपीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार दोन टप्प्यांत भाडेतत्त्वावर 500 ई-बस खरेदी करण्याचे निश्चित करण्यात येऊन 18 सप्टेंबर रोजी 150 ई-बससाठी निविदा जाहीर करण्यात आली होती. यात 25 बसेस 9 मीटर नॉन बीआरटी एसी, तर उर्वरीत 125 बसेस 12 मीटर बीआरटी एसी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिस (जीसीसी) वर घेण्याचे नियोजन आहे. याबाबतची निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर दोन कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यातील 9 मीटरसाठी एकच कंपनी आल्याने ही बस निश्चित झाली आहे.
उंचीची अट
12 मीटरच्या बीआरटी बससाठी दोन कपंन्या पुढे आल्या आहेत. यात टाटा आणि ओलेक्ट्रा यांचा समावेश असून यातील ओलेक्ट्रा कंपनीची ट्रायलही घेण्यात आली. मात्र, या बसेसकडून आवश्यक त्या अटी पूर्ण होत नसल्याने फेरनिविदा राबविण्यात आली आहे. तसेच, नव्या निविदेमध्ये 900 मिली मिटर प्लोअर हाईट उंचीची अट घालण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
सुरुवातीला 150 आणि नंतर 350 अशा दोन टप्प्यांत या बसेस घेण्यात येणार असून पहिल्या 150 बसेसाठी 18 सप्टेंबर रोजी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली होती. यावेळी निविदेला प्रतिसादन मिळत नसल्याने तब्बल तीनवेळा मुदतवाढ देण्यात आली होती. यानंतरही दोनच कंपन्या पुढे आल्याने आता पुन्हा निविदाप्रक्रिया राबविण्यात आली आहे. यामुळे आता पुन्हा राबविण्यात आलेल्या निविदेला प्रतिसाद मिळणार का? त्यामुळे खरेदीप्रक्रियेला उशीर होणार असल्याचे दिसून येते.