काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा ‘पीएमपी’च्या कार्यालयात ठिय्या
पुणे : ई-बस खरेदी प्रक्रियेची संपूर्ण माहिती गोपनीय ठेवण्यात येत असून वारंवार मागणी केल्यानंतरही माहिती देण्यात येत नाही. ‘पीएमपी’च्या कार्यालयात गेल्यानंतर संबंधित अधिकारी त्यांच्या कार्यालयातून पळ काढत असल्याने खरेदी प्रक्रियेबाबत संशय वाढल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केला आहे. दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘पीएमपी’च्या कार्यालयात ठिय्या मांडून खरेदी प्रक्रियेच्या कागदपत्रांची मागणी केली.
‘पीएमपी’ने 25 ई-बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्या 26 जानेवारीपर्यंत ‘पीएमपी’च्या ताफ्यात दाखल करण्याचा चंग भाजपच्या पदाधिकार्यांनी बांधला आहे. ई-बस खरेदीमुळे पीएमपीचे करोडो रुपयांचे नुकसान होणार असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. पीएमपीचे तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी ई-बस खरेदीबाबत अनेक आक्षेप नोंदविले होते. त्या आक्षेपांचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसकडून आक्षेपांची माहिती ‘पीएमपी’ने द्यावी, अशी वारंवार मागणी करण्यात येत आहे. ‘पीएमपी’कडून ई-बस खरेदीची प्रक्रिया अत्यंत गोपनीय ठेवण्यात येत असून अधिकार्यांवर दबाब आणण्यात येत असल्याची टीकाही शिंदे यांनी केली. ही माहिती मिळावी म्हणून शिंदे, अविनाश बागवे, अजित दरेकर, रफिक शेख, भय्यासाहेब जाधव आणि चाँदबी नदाफ आदींनी ’पीएमपी’च्या कार्यालयात ठिय्या मांडला होता.
पीएमपी’कडून एखादी माहिती मिळावी यासाठी नगरसेवक म्हणून माहिती अधिकारात माहिती मागविण्याची वेळ येत असेल तर, सत्ताधार्यांनी गांभीर्याने विचार करावा. यामध्ये कुठलाही गोंधळ नसेल तर पारदर्शकपणे ही माहिती तत्काळ सर्वसामान्यांसाठी खुली करणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नसल्याने याबाबत संशयाचे धुके दाट झाले असल्याची टीका शिंदे यांनी केली. शिंदे यांनी पाठविलेल्या पत्रात ई-बस खरेदी निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असून, त्यामधून मोठ्या प्रमाणात ‘पीएमपी’चे नुकसान होणार असल्याचा दावा केला आहे. तसेच, तत्कालीन अध्यक्ष मुंढे यांच्या काळात देखील ही प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यांनी या प्रकरणी काढलेले आक्षेप, टिपणी तसेच या प्रक्रियेची संपूर्ण फाइलची एक प्रक तातडीने मिळावी, अशी विनंती केली आहे.