उंटावरून साखर वाटून कन्येच्या जन्माचे केले स्वागत!

0

पिंपरी-चिंचवड : वंशाला दिवा हवा, म्हणून मुलाच्या जन्माचा आग्रह आजही धरला जातो. मुलाच्या तुलनेत मुलीला कनिष्ठ स्थान दिले जाते. त्याच मानसिकतेतून स्त्री-भ्रूणहत्येच्या घटना घडत असताना मुलगी व्हावी, अशी अपेक्षा बाळगलेल्या रेड्डी दाम्पत्याला कन्यारत्न झाले. लक्ष्मीच्या रुपाने घरात मुलीचे आगमन झाले. त्यामुळे आनंदून गेलेल्या रेड्डी कुटुंबीयांनी पिंपळे गुरव येथील गांगर्डेनगरमध्ये उंटावरून साखर वाटप केली. कैलास रेड्डी व वर्षा रेड्डी असे या दाम्पत्याचे नाव आहे. एवढेच नव्हे, तर ‘बेटी बचाव’च्या जनजागृतीबाबत कैलास व वर्षा रेड्डी यांनी सतत जनजागृती केली आहे.

रेड्डी कुटुंबीय उच्चशिक्षित
रेड्डी कुटुंबीय मूळचे परभणीचे. मात्र, गेल्या 40 वर्षांपासून ते पिंपळे गुरवमधील गांगर्डेनगर परिसरातच वास्तव्यास आहेत. 2011 मध्ये कैलास व वर्षा यांचा विवाह झाला. कैलास यांची पत्नी वर्षा यांनी डी.एड्.पर्यंत शिक्षण घेतले आहे. त्या खासगी शाळेत नोकरीस आहेत. तर कैलास बांधकाम साईटवर काम करतात. कैलास यांना चार बहिणी होत्या. त्यातील एकीचे काही वर्षांपूर्वी अपघातात निधन झाले. कैलास त्यांच्या आई-वडिलांसाठी एकुलता एक मुलगा अशी परिस्थिती असताना, वंशवेल वाढविण्यासाठी मुलगाच हवा, असा आग्रह त्यांनी कधी धरला नाही. मुलगी व्हावी, अशीच अपेक्षा त्यांनी बाळगली होती. एवढेच नव्हे, तर समाजात वावरताना, नेहमी ते ‘बेटी बचाव’चे महत्त्व पटवून देत होते.

जनजागृतीसाठी सतत प्रयत्नशील
कैलास रेेड्डी हे स्वत:चा वाढदिवस साजरा करतेवेळी तसेच मकरसंक्रांतीला तिळगूळ वाटप करतानाही ते मुलीच्या जन्माचे महत्त्व पटवून देणारे शुभेच्छा पत्रांचे मित्रमंडळीला वाटप करायचे. मुलगी व्हावी, ही त्यांची इच्छा पूर्ण झाली. मुलीच्या जन्माचा आनंद झाल्याने परिसरातील नागरिकांना त्यांनी उंटावरून साखर वाटली. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ संकल्पनेच्या जनजागृतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत.