पुणे:-राज्यासह पुणेकरांना ‘मे हिट’ चा तडाखा बसत असून राज्यातील तापमानाचा पारा 45 अंश सेल्सिअस च्या पुढे गेला आहे.अशात हवामान खात्याकडून दिलासादायक वृत्त आले असून शनिवार तसेच रविवारी जिल्ह्यासह राज्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
राज्यात कोकण भाग वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भात उष्णतेची लाट आली आहे. रोज तापमानाचा पारा उच्चांक गाठत आहे. बुधवारी राज्यात सर्वाधिक तापमान चंद्रपूर जिल्हयात नोंदवले गेले. चंद्रपूर येथील तापमान 46.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुणे शहरात दिवसभरात 23.9 अंश सेल्सिअस किमान आणि 37.6 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. पुणे शहरात सकाळी, संध्याकाळी जोरात वारा सुटला होता.परंतु दुपारी पुणेकरांना उन्हाचे चटके जाणवले.
राज्याच्या बहुतांश भागात शनिवार, रविवारी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पुणे शहरात शनिवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा तर रविवारी वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.