तळेगाव एसटी आगर व्यावस्थापकांना निवेदन;मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन
तळेगाव दाभाडे । मावळ तालुक्यातील उकसान येथे जाणारी एस. टी. बस त्वरित सुरू करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी विद्यार्थी आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाला विद्यार्थ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या मोर्चाचे नेतृत्व पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी केले. मोर्चात जिल्हा इंटकचे अध्यक्ष विजय काळोखे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, राष्ट्रवादी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बस बंद केल्यामुळे नागरिक संतप्त
शाळकरी विद्यार्थी, प्रवासी नागरिक, कामगार, यांच्यासाठी उकासन ही बस सोयीची आहे. यापूर्वी ही गाडी चालू होती. मात्र, तळेगाव आगाराने ही बस बंद केल्यामुळे विशेषत: विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होती. उकासन ते कामशेत, कोंडेश्वर ते कामशेत या डोंगरी भागातून येणार्या विद्यार्थ्यांना खाजगी वाहतुकीच्या गाड्यांचा आधार घ्यावा लागत होता. परीक्षा काळात ही मागणी पूर्ण व्हावी, यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. तळेगाव आगर व्यावस्थापक स्मिता कुलकर्णी यांनी निवेदन स्वीकारून मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.