भुसावळ। शहरातील जळगाव रोड परिसरात असलेल्या गणेश कॉलनी रिक्षा स्टॉपजवळ रात्रीच्या सुमारास उघड्यावर प्रातःविधी केला जात असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देवून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी रहिवाशांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले आहे. पालिका प्रशासनाने शहरात हगणदारीमुक्त अभियान राबविले मात्र याचा काहीही परिणाम होतांना दिसून येत नसल्यामुळे शहरात हागणदारीची समस्या जैसे थे आहे.
दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव
नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष देखील याच प्रभागातील असून तेथून काही अंतरावरच पालिका रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी राहतात. प्रशासकीय अधिकारीदेखील याच भागात रहिवासाला आहे. त्यामुळे पालिकेचे अतिमहत्वाचे व्यक्ती या भागात निवासाला असून देखील गणेश कॉलनी रिक्षा स्टॉपजवळील हगणदारी मात्र मुक्त होण्याचे नाव दिसत नाही. तसेच जळगाव रोेडवरील पालिका शाळा क्रमांक 1 चे मैदान हे सार्वजनिक शौचालयासारखे वापरले जात आहे. या शाळेच्या पटांगणात परिसरातील नागरिक सर्रासपणे शौचविधी करीत असतात. यासंदर्भात मथुरा अपार्टमेंट व अपूर्व प्लाझा याठिकाणी राहणार्या रहिवाशांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे. याची पालिका प्रशासनाने काही एक दखल घेतली नाही. अपार्टमेंट समोरच कचर्याचा ढीग साचलेला असून तेथे अवैधरित्या अतिक्रमण करुन जनावरांचा गोठा तयार करण्यात आला आहे. जनावरांचे गोमुत्र तेथेच साठवून ठेवले जात असल्याने परिसरात दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव वाढीस लागत आहे. यामुळे परिसरातील रहिवाशांचे आरोग्य संकटात सापडले असून यासंदर्भात प्रशासनाने दखल घेवून योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. या निवेदनावर विनायक वारके, रवी नारखेडे, मनोज भोळे, कल्पेश पाटील, केतन जोशी आदींच्या स्वाक्षर्या आहेे.