उघड्यावर शौचविधी करणार्‍यास गुलाब पुष्प

0

अमळनेर। शासनातर्फे स्वच्छ भारत मोहिम राबविली जात आहे. या मोहिमे अंतर्गत संपुर्ण राज्य 2018 पर्यत हगणदारी मुक्त करण्याचे ध्येय शासनाने ठेवले आहे. हगणदारीमुक्तीसाठी शासन विविध उपाययोजना करीत आहे. वैयक्तिक अनुदान देखील देत आहे. परंतु अजुनही जळगाव जिल्हा शंभर टक्के हगणदारीमुक्त झाला नसल्याची आकडेवारी समोर आली आहे. 1 जानेवारी पासून उघड्यावर शौच करणार्‍या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करुन फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश शासनाने दिले आहे. उघड्यावर शौच विधी करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार असून त्यासाठी गुड मॉर्निग पथकाची नेमणुक देखील करण्यात आली आहे.

अमळनेर तालुक्यातील अटाळे येथे गुड मॉर्निग पथकाने शनिवारी पहाटे भेट दिली. यावेळी त्यांनी उघड्यावर शौचास बसलेल्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत केले. उघड्यावर शौचविधी करणार्‍यांना पथकाने दंडात्मक व फौजदारी कारवाई विषयी माहिती दिली. गुड मॉर्निग पथकात सहायक गटविकासाधिकारी बी.डी. गोसावी, ग्रामसेवक नितीन पाटील, अभय मोरे, महिला ग्रामसेवक स्वाती पाटील, कविता साळुंखे, कल्पना पाटील, स्नेहलता देसले यांचा समावेश होता. सरपंच कमलबाई मिस्तरी, उपसरपंच प्रकाश पाटील, कर्मचारी पंढरीनाथ मिस्तरी यांनी गावातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत मार्फत शौचालय बांधण्यासाठी अनुदान देण्यात आले आहे. नागरिकांनी त्यांचा वापर करणार आहे. तसेच गाव हगणदारी मुक्त होईल अशी ग्वाही गुड मॉर्निंग पथकाला दिली.