उघड्यावर शौचास जाणार्‍यांकडून दंड वसूली

0

जळगाव। शहर हागणदारीमुक्त करण्यासाठी महानगर पालिकेने पुढाकार घेतला आहे. यात उघड्यांवर शौचास जाणार्‍यांवर आरोग्य विभागातर्फे कारवाई करण्यात येत आहे. यातच आरोग्य विभागातर्फे शनिवारी 1 एप्रिल रोजी असोदा रोड भागात धडक कारवाई करीत उघड्यावर शौचास बसणार्‍या सहा नागरिकांना दंड ठोठावला आहे. महानगर पालिकेच्या आरोग्य विभागातर्फे उघड्यावर शौचालयास बसलेल्यांना प्ररावृत्त करण्यासाठी पथक नेमले आहे. या पथकास सकाळी 7 वाजता आसोदा रोड भागात उघड्यावर शौचास काही नागरिक बसलेले दिसून आले. यात, रामा रामदास भिल्ल, सतिष जगन्नाथ साळी, गुलचंद पंडीत बाविस्कर, विठ्ठल काजी, अरूण धनजी महाजन, मज्जीद शहा हसन शहा असे सहा जणांवर प्रत्येकी 200 रूपये दंड ठोठावण्यात आला.

वैयक्तीक शौचालयांसाठी अनुदान
यावेळी आरोग्याधिकारी डॉ. विकास पाटील, एस.बी.बडगुजर, ए.एन.नेमाडे, एस.पी.अत्तरदे आदी मुख्य स्वच्छता निरीक्षक तसेच आरोग्य निरीक्षक एन.ई.लोखंडे, बबन सोनवणे, प्रकाश तांबोळी व सुनिल सोनवाल आदी कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, महापालिकेच्या इमारतीत थुंकणार्‍या फैजपूर येथील रईस खान यावर दंडात्मक कारवाई करून महापालिकेने अस्वच्छतेला आळा घालण्याचा प्रयत्न केला आहे. थुंकणार्र्‍यांवर रोजच धडक दंडात्मक कारवाई व्हावी अशी अपेक्षा नागरिकांमध्ये उमटत आहे. शहर हागणदारी मुक्त होण्यासाठी महानगर पालिकेतर्फे ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा नागरिकांसाठी वैयक्तीक शौचायल बांधण्यासाठी अनुदान देण्यात येत आहे.