उघड्या गटारांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0

पनवेल । पनवेल शहरातील व सध्याच्या महापालिका हद्दीतील बहुतांशी गटारे उघड्यास्थितीत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्‍न उपस्थित झाला आहे. या उघड्या गटारावर आरसीसी बांधकाम करून नागरिकांना चालण्यासाठी पदपथ तयार करण्याची मागणी शेकापचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे. पनवेल शहरातील लाइन आळी, पटेल मोहल्ला, कोर्ट परिसर, रोहिदास वाडा, बावन बंगला, कोळीवाडा आदी ठिकाणची गटारे उघड्या स्थितीत आहेत. त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. उघड्या गटारांमुळे काही ठिकाणी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. बावन बंगला परिसरातील गटारे बंद झालेली आहेत, तर काही ठिकाणची गटारे तुंबलेली दिसत आहेत. पनवेल महापालिका होऊन 13 महिने उलटून गेले, तरीदेखील पनवेलच्या समस्या संपत नसल्याचे चित्र आहे.

पनवेल शहरातील कचरा प्रश्‍नही दिवसेंदिवस होत चाललाय जटिल
पनवेल हे जुने शहर आहे. सध्याची उपनगरे व सिडकोच्या हद्दीतील खारघर, कामोठे यांची सुधारणा झालेली दिसत आहे. मात्र पनवेल शहरातील कचरा प्रश्‍न, उघडी गटारे यांचा प्रश्‍न सुटलेला दिसत नाही. कचर्‍याचा प्रश्‍न तर दिवसेंदिवस जटिल बनत चालला आहे. पनवेल शहरातील उघड्या गटारामुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. काही ठिकाणची गटारे तुटली असल्याने त्यातील लोखंडी सळ्या वर आलेल्या आहेत. त्यामुळे येथून चालताना नागरिकांना त्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पनवेलमध्ये यापूर्वी गटारात दुचाकी चालक पडल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात घडण्याआधी महापालिकेने गटारांच्या दुरुस्तीकडे लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

पनवेल महापालिका झाल्यानंतर पनवेल महापालिकेच्या पाच महासभा झाल्या. मात्र, या उघड्या गटारांची समस्या सुटली नसल्याने नागरिक चिंतित आहेत. पनवेल महापालिका झाल्याने पनवेलची व्याप्ती मोठ्या प्रमाणत वाढलेली आहे. महापालिकेत 29 गावांचादेखील समावेश करण्यात आला आहे. पनवेलमध्येदेखील मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढत आहे. असे असले तरी आधीच्या नगरपालिकेच्या हद्दीतील पनवेल शहराची तरी व्यवस्थित सुधारणा करण्याची मागणी करण्यात येत आहे.

गटारांचे आरसीसी बांधकाम करा
शहरातील गटारांची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. या पूर्वी बांधकाम करण्यात आलेली आरसीसी गटारे ही निकृष्ट दर्जाची आहेत. त्यामुळे या गटारांवर नागरिकांना चालण्यासाठी पदपथ तयार करण्यास अडचणी निर्माण होत आहेत. महापालिका हद्दीतील समाविष्ट 29 गावे, सिडको नोड, पनवेल शहरातील गटारे आरसीसी बांधकाम करून पदपथ तयार करावे. महापालिकेने एमएमआरडी अंतर्गत पनवेल शहरात सिमेंट काँक्रिटीकरण केलेल्या रस्त्यालगत ज्या पद्धतीने आरसीसी गटारांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इतर गटारांचे बांधकाम करण्यात यावे. आरसीसी बांधकाम करून त्यावर पेव्हर ब्लॉक बसवावे, अशी मागणीही प्रीतम म्हात्रे यांनी केली आहे.