देहूरोड : पावसाळ्यात डासांमुळे होणारे डेंग्यू, न्युमोनिया, टाईफाईड अशा आजारांनी डोके वर काढले आहे. देहूरोड परिसरात साथीच्या आजारांची साथ जोरात सुरू आहे. देहूरोड येथे महामार्गावरील उड्डाणपुलाच्या कामावर अनेक उघड्या टाक्या असून, त्यात पाणी भरलेले आहे. पाण्याचा संचय होत असलेल्या या उघड्या टाक्यांकडे संबंधितांसह स्थानिक प्रशासनाचेही दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे भरवस्तीत सुमारे दोन महिन्यांपासून पाणी साठवून ठेवलेल्या या टाक्यांमुळे मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे.
टाक्यांमध्ये साचले पावसाचे पाणी
देहूरोड बाजारपेठेलगत महामार्गावर सध्या उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामातील खांब उभारणी अंतिम टप्प्यात आहे. या खांबांना पाणी मारण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी काही पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या होत्या. आता जोरदार पाऊस झाल्यामुळे या टाक्यांमधील पाण्याची फारशी आवश्यकता भासली नाही. शिवाय पावसाचे पाणी या उघड्या टाक्यांमध्ये भरले गेल्याने या टाक्या आजही फुल्ल आहेत. दरम्यान, या टाक्यांतील पाणी दिवसेंदिवस साठून राहिल्यामुळे यात डासांच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात उत्पत्ती होत आहे.
परिसरात डासांचा उपद्रव वाढला
या प्रकारामुळे आसपासच्या भागात डासांचा उपद्रव वाढला असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून होत आहेत. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी या टाक्या ठेवण्यात आली आहेत; तेथून हाकेच्या अंतरावर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे रुग्णालय असून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी रोज येता-जाता या टाक्या पाहतात. ते कधी तरी या टाक्यांची तक्रार प्रशासनाकडे करतील का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाने संबंधित ठेकेदार कंपनीस याबद्दल विचारणा करून आवश्यक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.