उच्चशिक्षितांना संधी द्या

0

पिंपरी-चिंचवड । महापालिकेत नव्याने होणार्‍या शिक्षण समितीवर सर्वपक्षीय उच्चशिक्षित व पदवीधर नगरसेवकांना संधी द्यावी, अशी मागणी मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी महापालिकेकडे केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत त्यांनी निवेदन दिले आहे. राज्य सरकारच्या आदेशानुसार शिक्षण मंडळ बरखास्त झाले आहे. त्यामुळे नव्याने शिक्षण समितीची स्थापना करावी लागणार आहे. या समितीवर सर्वपक्षीय उच्चशिक्षित व पदवीधर नगरसेवकांना घेण्यात यावे.

महापालिकेच्या अनेक शाळांची दुरवस्था झाली आहे. दिवसेंदिवस शाळेचा दर्जा घसरत आहे. विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वेळेवर मिळत नाही. मराठी शाळा बंद होत आहेत. या गोष्टींचा दर्जा वाढविण्यासाठी, विद्यार्थ्यांचा मराठी शाळेकडील कल वाढावा म्हणून सर्वपक्षीय उच्चशिक्षित व पदवीधर नगरसेवकांनाच संधी द्यावी, असे चिखले यांनी निवेदनात म्हटले आहे.