उच्चशिक्षित वधू-वरांनी केले सामूहिक विवाह सोहळ्यात आदर्श लग्न

0

शिंदखेडा। एका बाजुला विवाह समारंभात होणारा मोठा आर्थिक खर्च, मानपान या गोष्टी अधिक वरचढ होत असतांनाच दुसर्‍या बाजूला उच्चशिक्षीत तरुण-तरुणींमध्ये साध्या पद्धतीने विवाह समारंभ आटोपण्याच्या बाबतीत जागरुकता दिसून येते. शिंदखेडा येथील मराठा समाजाच्या महेंद्र व रीना या वधू-वरांनी समाजातील अनिष्ठ प्रथा बाजूला सारुन सामूहिक विवाह सोहळ्यात लग्न लावण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा विवाह समाजात आदर्श ठरेल. त्यांचा विवाह आज 7 मे रोजी नंदुरबार येथे झाला. वधूकडील मंडळींना वराकडील मंडळींचा मानपान राखणे क्रमप्राप्त होते. मराठा समाजासह अनेक समाजात आढळणार्‍या या चालीरितींना फाटा देऊन महेंद्र व रीना यांचा पाहणी कार्यक्रम झाला .

पेपर वाटप करत घेतले शिक्षण : वर महेंद्र हा कै.शामराव मराठे यांचा चिरंजीव. एम.एड.बी.एड.शिक्षण घेऊन शिक्षक म्हणून कार्यरत. वडील लहान असतांनाच वारले. आम्हा दोन भाऊ व दोन बहिणींचा सांभाळ आई भिकूबाई मराठे यांनी केला. बहिण व भावांमध्ये कधीही भेदभाव केला नाही. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने लहान असतांना बीया विकून पेपर वाटण्याचे काम केले. दुसर्‍याच्या दुकानावर काम करावे लागत होते. परंतू शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे लक्षात घेऊन एम.ए.पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले व शिक्षक म्हणून नोकरीला आहे. दोन्हीकडील वरिष्ठ मंडळींनी विवाह साधेपद्धतीने करण्याचा निर्णय घेतला.

कुटूंबाचा आर्थिक भार उचलला : वधू रीना हिच्या घरीदेखील वडिल देवराम मराठे यांचे निधन झाल्यावर कुटुंबाचा आर्थिक भार उचलण्याचा तिने कसोटीने प्रयत्न केला. त्यातच उच्चशिक्षण देखील घेतले व जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षिका म्हणून नोकरी करत आहे. लग्न म्हटले म्हणजे लग्नपत्रिका ती आलीच. लग्नविधीही आकर्षक असावी असाच आग्रह. लग्नपत्रिकेवर देखील खूप मोठा खर्च केला जातो. परंतू महेंद्र व रीनाच्या लग्नात लग्नपत्रिकाच नाही. विवाहाचे आमंत्रण दूरध्वनी व व्हॉटस्अप वरुनच देण्यात आले आहे.

साध्या पद्धतीने साखरपुडा
लग्नाआधी साखरपुडा देखील धुमधडाक्यात झाला पाहिजे असा आग्रह वराकडील मंडळींचा असतो. मात्र महेंद्र व रीना यांचा साखरपुडा कुटुंबियांच्या चारच व्यक्तींच्या उपस्थितीत करण्यात आला. समज येण्यापूर्वीच महेंद्र व रीना यांच्या आयुष्यात वडिलांचे छत्र हरवले. त्यामुळे युवक-युवतींना आई वडिल नाहीत. अशा तरुण-तरुणीच्या विवाह सोहळ्यात काही प्रमाणात मदत करण्याचा मानस दोघा वर-वधूंचा आहे. लग्नात होणारा मोठा खर्च हा दोन्ही कुटुंबांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबून टाकतो. त्यामुळे नंदुरबार येथे होणार्‍या समाजाच्या सामूहिक विवाह सोहळ्यातच लग्न लावण्याचा निर्णय वधू-वरांसह कुटुंबियांनी घेऊन समाजापुढे आदर्श निर्माण केला.