उजनीचे पाणी भीमा नदीत सोडा

0

आ.दत्तात्रय भरणे यांनी दिली माहीती

इंदापुर :- भीमा नदी पात्रात उजनी धरणातून पाणी सोडा अशी मागणी आमदार दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पुणे व सोलापूर जिल्ह्यातील आमदारांचे शिष्टमंडळ घेऊन केली होती. उजनी धरणातून गुरुवारी (दि. 15) भीमा नदी पात्रात पाणी सोडण्याचे सक्त आदेश जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उजनी धरण प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंतांना दिले आहेत, अशी माहिती इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.

सिंचनयोजन बंद पडण्याच्या मार्गावर
याबाबत सविस्तर माहिती अशी, इंदापूर तालुक्यातील भांटनिमगाव येथील बंधार्‍यावरती पाणी पुरवठा करणार्‍या सहकारी संस्था मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच वडापुरी गावाच्या हद्दीतील शेतकर्‍यांची उपसा सिंचन योजना देखील असल्याने भाडगाव, सुरवड, अवसरी, बेडशिंगे, रूई, आलेगाव या उपसा सिंचन योजना बंद पडण्याच्या मार्गावर असल्याने शेतकर्‍यांसह जनावरांच्या पाण्यावाचून हाल सुरू आहे.

कालवा समितीच्या बैठकीत मांडला प्रश्‍न
उजनी धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरल्याने शेतकर्‍यांनी पाण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाणी अर्ज दाखल केलेले आहेत, तरी देखील शेतीला पाणी मिळू शकत नाही या विदारक गोष्टी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना आमदार दत्तात्रय भरणे व सोलापूर जिल्ह्यातील आमदार बबन शिंदे, हनुमंत डोळस, नारायण पाटील व सोलापूरचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी निवेदनाद्वारे पटवून दिल्या त्यावर उजनी धरणाच्या उन्हाळी हंगाम कालवा सल्लागार समिती बैठक जलसंपदा मंत्री गिरिष महाजन यांच्या दालनात झाली. यावेळी उजनी प्रकल्पाचे बिराजदार तसेच अधीक्षक अभियंता चौगुले या वेळी उपस्थित होते. विषेश म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन या बैठकीला उपस्थित नसताना देखील गंभीर प्रश्‍न असल्याने भीमा नदीत गुरुवारी (दि. 15) सोडण्याच्या सुचना संबंधित अधिकारी वर्गाला दिल्या, असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.