पुणे : संपूर्ण महाराष्ट्रात दुसर्या क्रमांकाचे मोठे असलेल्या उजनी धरणाचा पाणीसाठा दीड महिन्यात जवळपास 12 टक्क्यांनी कमी झाला आहे. 3 ऑगस्ट रोजी उजनी धरणात 106 टक्के पाणीसाठा होता. मात्र आजमितीला धरणात 94.09 टक्के पाणीसाठा असल्याची माहिती उजनी धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आली. दीड महिन्यात 12 टक्के पाणी कमी झाल्यामुळे आगामी काळात काय परिस्थिती ओढवेल, याचा प्रत्यय आत्ताच येऊ लागला आहे.
आत्मदहनाचा इशारा
उजनी धरणासाठी जमिनी देऊन इंदापूर तालुक्यातील शेतकरी भूमिहीन झाला आहे. त्यामुळे येथील शेतकर्यांवर अन्याय होता कामा नये. पाण्याचे वाटप होताना समन्यायी वाटप होणे गरजेचे आहे. आमच्यावर अन्याय झाल्यास आम्ही आत्मदहन करू, असा इशारा उजनी धरण बचाव कृती समितीने दिला आहे. सध्या उजनी धरणातून जेऊर ते परंडा बोगद्याचे काम सुरू आहे. मात्र त्याची खोली वस्तुस्थितीला धरून नाही. कॅनॉलपेक्षा बेड लेवलपेक्षा दोन मीटर खोल असल्याची माहिती जगताप यांनी दिली. त्यामुळे उजनी धरण व्यवस्थापनात समान न्याय देण्याची मागणी होत आहे.
शेतकरी संतप्त
उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांवर अन्याय होत आहे. याबाबत इंदापूर तालुक्यातील शेतकर्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. उजनी धरणासाठी आम्ही जमिनी दिल्या. मात्र, आमचा कोणीही विचार करीत नाही. पुढील वर्षी उजनी भरण्यास सप्टेंबर महिना उजाडणार आहे. आताच ही परिस्थिती निर्माण झाल्यास आम्ही शेती करायची कशी? असा प्रश्न इंदापूर तालुक्यातील शेतकरी विचारत आहेत. आमच्या हक्काचे पाणी आरक्षित ठेवून सोलापूर जिल्ह्याला पाणी द्या. मात्र, आमच्या हक्काच्या पाण्याला धक्का लागल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा इंदापूर तालुक्यातील उजनीलगतच्या शेतकर्यांनी दिला आहे.