उजनीच्या पाण्याला हात लावू देणार नाही

0

हर्षवर्धन पाटील यांचा इशारा : इंदापूर तालुक्यातील पळसदेवला धरणग्रस्तांचा मेळावा

इंदापूर : कृष्णा-भीमा स्थिरीकरण प्रकल्पातून मराठवाड्याला पाणी देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, आमच्या हक्काचे पाणी कोणी नेणार असेल तर ते आम्ही कदापिही सहन करणार नाही. या प्रकल्पाचे नाव खरे कुंभी-कासारी-कृष्णा-कोयना, असे होते. त्याचे नाव बदलून नीरा-भीमा स्थिरीकरण, असे करण्यात आले आहे. जोपर्यंत हे पाणी येत नाही. तोपर्यंत उजनीच्या पाण्याला हात लावू दिला जाणार नाही, असा निर्वाणीचा इशारा माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दिला आहे. उजनी धरणग्रस्त बचाव कृती समितीच्या वतीने इंदापूर तालुक्यातील पळसदेव येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अ‍ॅड. कृष्णाजी यादव, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजीराव बंडगर, कृती समितीचे अध्यक्ष अरविंद जगताप, अंकुश पाडुळे, पद्मा भोसले, रमेश जाधव, दीपक जाधव, संजय देहाडे, हनुमंत बनसुडे आदींसह धरणग्रस्त शेतकरी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तीव्र लढा उभारणार

नदी जोड प्रकल्पाचे सात किलोमीटर बोगद्याचे काम झाले आहे. त्यामुळे आगामी काळात धरणग्रस्तांवर मोठे संकट ओढावणार आहे. उजनीची पातळी 492 मीटर आहे. तर बोगद्याची खोली 487 मीटर आहे. यावरून उजनीचे सगळेच पाणी मराठवाड्याला जाऊ शकते. वेळीच आपण जागे झालो नाही तर उजनी जलाशयाची परिस्थिती भीमा नदी किंवा वाळवंटासारखी होईल, अशी भीती पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. उजनी धरणासाठी जमिनी देऊन अनेक शेतकरी भूमिहीन झाले. त्यामुळे आमच्या हक्काच्या पाण्याला कदापिही धक्का लावून दिला जाणार नाही. आगामी काळात इंदापूर तालुक्यातील शेतकर्‍यांसह कर्जत, करमाळा, दौंड, माढा येथील शेतकर्‍यांसह तीव्र लढा उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

हा घाट कशासाठी?

नीरा-भीमा नदी जोड प्रकल्प व उजनीचे हक्काचे पाणी मराठवाड्याला कसे जाऊ शकते, याविषयी माहिती देताना पाटील बोलत होते. सध्या मराठवाड्याला पाणी नेणार्‍या बोगद्याचे काम सुरू आहे. यासाठी 3 हजार 600 कोटी रुपये देण्यात येणार आहेत. भूम, परांडा, उस्मानाबाद, चौटालापर्यंत पाणी जाणार आहे. कुंभी-कासारी प्रकल्पातील पाण्याचे नियोजन झाले नसताना हा घाट कशासाठी? असा खडा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

शेतकरी भावनाविवश

या मेळाव्यात काळेवाडी येथील धरणग्रस्त शेतकर्‍यांनी मनोगत व्यक्त केले. उजनीचे पाणी आगामी काळात राहिल की नाही, याविषयी बोलताना त्यांचा कंठ दाटून आला होता. यावरून बोगद्यातून मराठवाड्याला उजनीद्वारे जाणार्‍या पाण्याची कल्पना येते. आगामी काळात पश्‍चिम महाराष्ट्रविरुद्ध मराठवाडा असा पाण्याचा वाद पेटणार, हे निश्‍चित आहे.